Mumbai Metro 3 : भुयारी मेट्रोला पावसाचा फटका, 16 दिवसांपूर्वीच झालं होतं उद्घाटन; स्थानकात आता पाणीच पाणी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मे रोजी मुंबई मेट्रो लाइन 3 बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो लाइनचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर मेट्रो लाइनची अशी अवस्था झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबईत रात्रभरापासून पावसाचा जोर सुरूच आहे. हवामान विभागाकडून मुंबई-ठाण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारवर्गाला पावसाचा नाहक त्रास सहन करावा लागला. याचा फटका मुंबई लोकल आणि रस्ते वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळालं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला या पावसाचा फटका बसला आहे. 16 दिवसांपूर्वीच या मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मुंबई मेट्रो तीन प्रकल्प पहिल्याच पावसात पाण्यात गेल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक मेट्रो स्थानकात पाणी साचल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे दुपारी आचार्य अत्रे स्टेशनपर्यंतची मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे मेट्रोच्या स्थानकात पाणी साचलं होतं. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकाचे व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये मेट्रोच्या छतावरुनही पाणी कोसळत असल्याचं दिसून येत आहे. 

नक्की वाचा - Mumbai Rain: 'महाभ्रष्ट महायुतीने मुंबई डुबवली...', काँग्रेस- ठाकरे गटाचे सरकारवर टीकास्त्र

16 दिवसांपूर्वीच उद्घाटन...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मे रोजी मुंबई मेट्रो लाइन 3 बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो लाइनचं उद्घाटन केलं होतं. यानंतर 10 मे शनिवारपासून ही सेवा सर्वांसाठी सुरू करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  बीकेसी ते सिद्धिविनायक स्टेशनपर्यंत प्रवास केला होता. ऑगस्टमध्ये आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंत हा मेट्रो लाइन तीनचा शेवटचा टप्पा सुरू करणार असल्याचंही सांगितलं होतं.