Mumbai Rains : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने मागील 3-4 दिवसांपासून ठाण मांडलं आहे. मंगळवारी सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर वाढलाआहे. आज मुंबईकरांना मुसळधार पाऊस आणि समुद्रातील भरती या दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार आहे. सोमवार रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. अंधेरी परिसरातील वीरा देसाई रोडवर गुडघ्यापर्यंत पाणी भरले आहे, ज्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
हवामान विभागाचा 'रेड अलर्ट' आणि वाऱा
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह अधूनमधून 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे पुढील काही तासांत मुंबईतील परिस्थिती आणखी बिघडू शकते. मुसळधार पाऊस आणि भरतीची वेळ एकत्र आल्यास, शहरातील सखल भागांतील पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे पाणी साचण्याची समस्या अधिक तीव्र होते.
(नक्की वाचा- Mumbai Local Train Update: पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत! तिन्ही मार्गावरील लोकल उशिरा, वाचा सविस्तर)
समुद्रातील भरती-ओहोटीची वेळ (19 ऑगस्ट)
- भरतीची वेळ - सकाळी 9.16 वाजता (3.75 मीटर)
- ओहोटी वेळ- दुपारी 3.16 वाजता (2.22 मीटर)
- भरती - रात्री 8.53 वाजता (3.14 मीटर)
- ओहोटी - मध्यरात्रीनंतर 3.11 वाजता (1.05 मीटर)
(नक्की वाचा- School Holiday List: पावसाचे तुफान! 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, अकरावी प्रवेशाबाबतही मोठा निर्णय)
विमानसेवेवर परिणाम
या पावसाचा परिणाम फक्त रस्त्यांवरच नाही, तर हवाई वाहतुकीवरही झाला आहे. इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांसाठी गाईडलाईन जारी केली आहे. मुंबई विमानतळाकडे येणाऱ्या अनेक मार्गांवर पाणी साचले असून वाहतूक मंदावली आहे. यामुळे विमान उड्डाणे आणि लँडिंग दोन्हीमध्ये विलंब होत असल्याचे म्हटले आहे. प्रवाशांनी घरी निघण्यापूर्वी वाहतुकीची स्थिती तपासावी आणि पुरेसा वेळ घेऊन घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.