Mumbai Rains Update: मिठी नदी धोका पातळीवर, NDRF टीम तैनात; काही नागरिकांचं स्थलांतर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, "मुंबईत मिठी नदीचा जलस्तर वाढत आहे. जर पाण्याची पातळी आणखी वाढली, तर बीएमसीने नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरु केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Rains Update: मुंबईतील जोरदार पावसाने मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, ती धोक्याच्या पातळीच्या वर पोहोचली आहे. मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने याचा सर्वाधिक धोका कुर्ला येथील क्रांतीनगर आणि कुर्ला ब्रिज परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका (BMC) आणि पोलिसांनी तात्काळ अलर्ट जारी केला आहे.

मिठी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या क्रांतीनगर परिसरात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, स्थलांतराची आवश्यकता नाही, असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, नंतर परिस्थिती अधिक गंभीर झाल्याने कुर्ला पश्चिम येथील बैलबाजार जवळील क्रांतीनगर परिसरातील सखल झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जवळच्या मगन नथुराम म्युनिसिपल स्कूलमध्ये असलेल्या निवारा स्थळी हलवण्यास सुरुवात झाली आहे. काही लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं की, "मुंबईत मिठी नदीचा जलस्तर वाढत आहे. जर पाण्याची पातळी आणखी वाढली, तर बीएमसीने नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरु केली आहे. मी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, बीएमसी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे."

मिठी नदी मुंबईच्या अनेक महत्त्वाच्या भागांतून वाहते. ज्यात जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या धारावीचाही समावेश आहे. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत आलेल्या भीषण पुरात मिठी नदीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या दिवशी 24 तासांत 944 मिमी पावसाची नोंद झाली होती. ज्यामुळे मिठी नदीला पूर येऊन संपूर्ण शहरात मोठी हानी झाली होती. त्या घटनेची आठवण करून देत, प्रशासन यावेळी कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही.

Advertisement

Topics mentioned in this article