मुंबईमध्ये गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांमध्ये 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये विक्रोळीत सर्वाधिक 255.5 मिमी पाऊस झाल्याचे समोर आले आहे.
नक्की वाचा: पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत! तिन्ही मार्गावरील लोकल उशिरा, वाचा सविस्तर
महालक्ष्मी परिसरात सर्वात कमी पावसाची नोंद
18 ऑगस्ट, सोमवारच्या सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत, सांताक्रूझ वेधशाळेने (पश्चिम उपनगरांचे प्रतिनिधित्व) 238.2 मिमी पावसाची नोंद केली आहे. त्याचबरोबर, दक्षिण मुंबईतील कुलाबा वेधशाळेत 110.4 मिमी पावसाची नोंद झाली. विक्रोळी, भायखळा, जुहू आणि वांद्रे या उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम होता. विक्रोळीमध्ये 255.5 मिमी, भायखळामध्ये 241 मिमी, जुहूमध्ये 221.5 मिमी आणि वांद्रेमध्ये 211 मिमी पावसाची नोंद झाली. या तुलनेत, मुंबईतील महालक्ष्मी परिसरात 72.5 मिमी इतका कमी पाऊस झाला.
रेल्वे सेवा विस्कळीत
सततच्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून, रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. विशेषतः मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
नक्की वाचा: पावसाचे तुफान! 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी, अकरावी प्रवेशाबाबतही मोठा निर्णय
विक्रोळीत दोघांचा मृत्यू
या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. विक्रोळी येथील वर्षा नगरमध्ये भूस्खलनामुळे दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, तर दोघे जखमी झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे.
हवामान विभागाने मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांसाठी पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. समुद्रात मोठी भरती येण्याची शक्यता असल्याने सखल भागात पाणी साचण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे, नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे सांगण्यात आले आहे.