Pune News: तोरणा किल्ल्यावर मुंबईच्या पर्यटकासोबत अंधारात भयंकर घडलं! काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Pune News: पुण्याच्या तोरणा किल्ल्यावर मुंबईतील पर्यटक 250 फूट खोल दरीत कोसळले. हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी धाडसी मोहीम राबवत त्यांना रात्रीच्या अंधारात सुखरूप बाहेर काढले.

जाहिरात
Read Time: 2 mins

अक्षय धायगुडे पाटील, पुणे

पुण्याच्या वेल्हे (राजगड) तालुक्यातील ऐतिहासिक तोरणा किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा पाय घसरून तो तब्बल 250 फूट खोल दरीत कोसळल्याची थरारक घटना घडली. सुदैवाने, स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे या पर्यटकाला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

नेमकी घटना काय?

मुंबईतील संजय वसंत नेवे (वय 64 वर्षे) हे आपल्या सहकाऱ्यांसोबत तोरणा किल्ला फिरण्यासाठी आले होते. किल्ल्यावरून उतरत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते सुमारे 250 फूट खोल दरीत कोसळले. ही घटना कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. 

Advertisement

रात्रीच्या अंधारात थरारक रेस्क्यू ऑपरेशन

घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने किल्ल्याकडे धाव घेतली. रात्र झाल्यामुळे किल्ल्यावर सर्वत्र काळोख पसरला होता, अशा परिस्थितीत मदतकार्य राबवणे मोठे आव्हान होते. मात्र, पथकाने जिद्दीने ही मोहीम हाती घेतली. बॅटरीच्या साह्याने डोंगराच्या अवघड चढ-उतारावर शोध घेण्यात आला.

(नक्की वाचा-  Bhendwal Bhakit: राज्यात पाऊस कसा असेल? राजकीय उलथापालथ होणार? भेंडवळच्या भाकितानं चिंता वाढली)

संजय नेवे यांचा ठावठिकाणा लागताच, टीमने दोरीच्या साह्याने खोल दरीत उतरून त्यांना सुरक्षितरीत्या वर काढले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मोहिमेत ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे नेवे यांचा जीव वाचला.

केवळ किरकोळ जखमा 

इतक्या मोठ्या उंचीवरून पडूनही संजय नेवे यांना केवळ किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना थोड्या प्रमाणात खरचटले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. 64 वर्षांच्या या पर्यटकाला सुखरूप वाचवल्यानंतर नेवे यांच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

(नक्की वाचा- TCS Nashik Case: वरिष्ठांचा छळ आणि लैंगिक शोषण का सहन केलं? एका पीडितेबाबत मन सुन्न करणारी माहिती समोर)

Advertisement

पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?

  • दुर्गम भागात फिरताना योग्य पादत्राणांचा वापर करा.
  • अंधार पडण्यापूर्वी किल्ल्यावरून खाली उतरण्याचे नियोजन करा.
  • अनोळखी वाटांवरून जाणे टाळा.
     
Topics mentioned in this article