अमोल सराफ, बुलडाणा
महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील ऐतिहासिक घटमांडणीचं भाकीत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात आलं आहे. सुमारे 350 वर्षांची परंपरा असलेल्या या घटमांडणीत यंदा पावसाची स्थिती, पिकांचे भवितव्य, देशाची अर्थव्यवस्था आणि राजकीय स्थितीबाबत अनेक संकेत देण्यात आले आहेत.
पावसाचं प्रमाण आणि शेती
यंदा पावसाची स्थिती सर्वसाधारण राहणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आलं आहे. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस भरपूर असेल. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहील. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असेल. शेवटच्या दोन महिन्यात पाऊस चांगला होईल, मात्र अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी महापूर येऊन पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष आव्हानात्मक ठरू शकतं. पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी ही पिके भरपूर येतील आणि त्यांना भावही चांगला मिळेल. ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिकं सर्वसाधारण राहतील.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईत अंड्यावर येणार 'एक्सपायरी डेट'? खराब-सडलेली अंडी विकणाऱ्यांवर चाप बसणार)
राजकीय आणि राष्ट्रीय संरक्षण स्थिती
घटमांडणीच्या निष्कर्षानुसार, देशाच्या राजकीय पटलावर स्थिरतेचे संकेत आहेत. देशाचे पंतप्रधान (राजा) आपल्या पदावर कायम राहतील, मात्र ते मानसिक किंवा राजकीय तणावात राहतील. देशाची संरक्षण स्थिती तणावपूर्ण असेल. संरक्षण खात्यावर मोठा ताण राहील आणि सीमांवरील परिस्थिती कमकुवत राहण्याचे संकेत आहेत.
अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्ती
देशाच्या आर्थिक आणि नैसर्गिक स्थितीबाबत वर्तवलेले भाकीत चिंताजनक आहे. देशाची आर्थिक स्थिती यंदा फारशी मजबूत राहणार नाही, अर्थव्यवस्था ढासळण्याचे संकेत आहेत. देशावर मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवण्याची शक्यता भेंडवळच्या भाकितात वर्तवण्यात आली आहे.
(नक्की वाचा- ‘आता परत येणार नाही...', भरउन्हात भलीमोठी रांग, पिण्याचं पाणीही नाही, गुजरातमध्ये युपी-बिहारींचे प्रचंड हाल)
350 वर्षांची ऐतिहासिक परंपरा
बुलडाण्याच्या जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या सायंकाळी पूर्णा नदीकाठी ही घटमांडणी केली जाते. मातीच्या घटात विविध धान्ये, पाणी आणि इतर चिन्हे मांडून दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला त्याचे निरीक्षण केले जाते. बदलत्या हवामानामुळे शेती संकटात असताना, शेतकरी या पारंपरिक अंदाजाकडे आशेचा किरण म्हणून पाहतात. मात्र या सर्व भाकितांना कुठलाही वैज्ञानिक, तांत्रिक आधार नसतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world