Mumbai News : दरवर्षी अनंत चतुर्दशीला होणारं गणपती विसर्जन मुंबई पोलिसांसमोरील सर्वात मोठं आव्हान असतं. दहा दिवस सुरू असलेल्या या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शहरभरातील हजारो मंडळांतून गणेशाच्या भव्य मूर्ती समुद्राच्या दिशेने विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. लाखो लोकांचा समुदाय विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतो. इतक्या मोठ्या संख्येने गर्दी असल्याने पोलिसांसाठी कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान असतं. यासह शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवणंही अवघड असतं. मुंबई वाहतूक पोलिसांसाठी यंदाच्या वर्षीचं विसर्जन अधिक आव्हानात्मक होतं, कारण शहरातील दोन मोठे पूल दुरुस्तीसाठी बंद आहेत.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे प्रमुख सत्यनारायण चौधरी (Mumbai Transport Branch Chief Satyanarayan Chaudhary) यांच्यासाठी शुक्रवारचा दिवस एक मोठं यश घेऊन आला. दोन कोटींची लोकसंख्या असलेल्या शहरावर तब्बल ३० ते ४० लाख वाहनं दररोज धावतात, तेथे गणपती विसर्जन कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय यशस्वी करणं कोणतंही युद्ध जिंकण्यापेक्षा कमी नव्हतं. इतकच नव्हे तर मुंबईतील सर्वात मोठं विसर्जन स्थळ असलेल्या गिरगाव चौपाटीला लागून असलेल्या, शहरातील सर्वात प्रतिष्ठित रस्ता मरीन ड्राइव्हवरही वाहतूक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू होती. लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीची विसर्जन मिरवणूक जाणाऱ्या मध्य मुंबईत सर्वात मोठं आव्हान होतं. मध्य मुंबईचे दोन प्रमुख पूल सायन ब्रिज आणि एलफिन्स्टन ब्रिजच्या दुरूस्तीचं काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करणं अपेक्षित होतं, मात्र ते होऊ शकलं नाही.
कारण वाहतूक पोलिसांच्या प्रमुख पदावरील नियुक्तीपूर्वी सत्यनारायण चौधरी मुंबई पोलिसांच्या सहआयुक्त (कायदा व्यवस्था) पदावर कार्यरत होते. गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईत काय स्थिती असते आणि त्या दिवशी शहर नेहमीप्रमाणे सुरू ठेवणं कोणत्याही अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसल्याचा त्यांना अदमास होता. त्यांनी आठवड्यापूर्वीच रणनीती तयार करण्यास सुरुवात केली होती. यासाठी त्यांनी वरळीच्या वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. मुख्यालयाच्या बैठकीत बसून रणनीती केली नाही तर प्रत्यक्षात मैदानात उतरून समस्या उद्भवणाऱ्या ठिकाणी जाऊन तपासणी केली.
मध्य मुंबईत १२०० वाहनांसाठी भव्य पार्किंग स्थळ...
मुंबई बंदराचे संचालन मुंबई पोर्ट ट्रस्टद्वारे केले जाते, ज्याचा शहरात सर्वात मोठा भूभाग आहे. या भूभागाचा एक मोठा भाग रिकामी होता. सत्यनारायण चौधरी यांनी गणेशोत्सवातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी मध्य मुंबईतील ही रिकामी जागा पार्किंगसाठी वापरायची ठरवली. ज्यावर एकाच वेळी तब्बल १२०० वाहनं उभी करता येऊ शकत होती. काही रस्त्यांवर वाहतूक वळवण्यात आली होती आणि यासाठी गुगलची मदत घेण्यात आली. वळविण्यात आलेल्या रस्त्यांची माहिती गुगलच्या माध्यमातून वाहन चालकांपर्यंत पोहोचविण्यात आली. २०० वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल हे रायडर म्हणून विसर्जन मार्गावर सतत गस्त घालत होते. विसर्जन मार्ग नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला होता. या रस्त्यावर जर कोणत्या वाहनात बिघाड झाला तर तातडीने त्याला हटविण्यासाठी ९० क्रेनची सोय करण्यात आली होती. वाहन चालक आणि विसर्जनात सामील भक्तांनी माहिती देण्यासाठी शहरभरात साइनबोर्ज लावण्यात आले होते. दिवसभर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती.
एनसीसी आणि स्वयंसेवी संघटनांच्या ७०० स्वयंसेवकांची मदत
मुंबईतील सर्व विसर्जन स्थळांवरही व्यापक तयारी करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांकडून वाहनांच्या वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी ५१ वॉच टॉवर लावण्यात आले होते. इतकं मोठं आयोजन सांभाळण्यासाठी सत्यनारायण चौधरी यांच्याजवळ वाहतूक पोलिसांचे केवळ ३ हजार कर्मचारी होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी जास्त लोकांची आवश्यकता होती आणि यासाठी एनसीसी आणि स्वयंसेवी संघटनांच्या जवळपास ७०० स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली. विसर्जनाच्या दिवशी सहआयुक्त चौधरी आपल्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवून होते. थोड्या वेळासाठी पाहणी करण्यास ते रस्त्यावरही उतरले. विसर्जनाच्या दिवशी दीड कोटी लोकसंख्येच्या शहरातील वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत ठेवणे, ही त्यांच्या पोलीस कारकिर्दीतील दुसरी मोठी कामगिरी मानली जाते. गेल्या वर्षी, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त असताना चौधरी यांनी मुंबईतील मराठा आंदोलन एकाही काठीचा वापर न करता हाताळले होते.