Mumbai News: मुंबई आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या संततधार आणि दमदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेला 'तानसा तलाव' आज 22 जुलै रोजी सकाळी 8 वाजून 51 मिनिटांनी पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या मान्सून हंगामात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी ओसंडून वाहणारा तानसा हा तिसरा तलाव ठरला आहे.
मुंबईला पाणी पुरवणारे 3 तलाव पूर्ण भरले
- विहार तलाव: 7 जुलै रोजी रात्री 9 वाजता पूर्ण भरून वाहू लागला.
- तुळशी तलाव: 7 जुलै रोजीच रात्री 11.43 वाजता ओसंडून वाहू लागला.
- तानसा तलाव: आज 22 जुलै रोजी सकाळी 8.51 वाजता ओसंडून वाहू लागला.
(नक्की वाचा- Ambernath Crime: वरवंट्याने ठेचलं, गुप्तांगावर मारहाण, आईच्या प्रियकराकडून चिमुकल्याची हत्या, कारण...)
आज सकाळी 6 वाजता पालिकेने केलेल्या ताज्या मोजणीनुसार, मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सर्व सातही तलावांमध्ये मिळून त्यांच्या एकूण क्षमतेच्या 61.90 टक्के इतका मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे.
तानसा धरणाचे वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक महत्त्व
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले तानसा धरण हे देशातील आणि जगातील अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. स्थापना आणि लांबी: या धरणाची स्थापना सन 1982 मध्ये झाली असून, याची लांबी 2,743.20 मीटर आहे. जगातील सर्वात लांब दगडी बांधकाम असलेल्या मोजक्या धरणांपैकी हे एक आहे.
(नक्की वाचा- दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! शरद पवार,सुप्रिया सुळे PM मोदींच्या भेटीला; भेटीचं कारण आलं समोर)
तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता 14,504 कोटी लीटर एवढी आहे. हे धरण मुंबईपासून सुमारे 106 किमी अंतरावर असून, येथून मुंबई शहराला रोज 455 दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईच्या एकूण पाणीपुरवठ्यात तानसा धरणाचा वाटा 11 टक्के आहे.