Crime News: अंबरनाथ पश्चिमेतील लादी नाका परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. आईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने तिच्या अवघ्या सात वर्षांच्या मुलाची निर्घृणपणे मारहाण करून हत्या केली. शारीरिक संबंध ठेवताना मुलगा अडथळा ठरत असल्याच्या विकृत रागातून हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी मुख्य आरोपी विकास सिंह याला तत्काळ अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
डोक्यावर वरवंट्याने वार अन् अमानुष मारहाण
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लादी नाका परिसरात राहणारी सकीना कुरेशी ही महिला तिचा प्रियकर विकास सिंह याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती. तिच्यासोबत तिचा सात वर्षांचा मुलगा हुसनैन कुरेशी देखील राहत होता. हुसनैन घरात असल्याने दोघांच्या शारीरिक संबंधात सतत अडथळा निर्माण होत होता. यावरून आरोपी विकास सिंह प्रचंड चिडला होता. याच रागातून विकासने हुसनैनवर जीवघेणा हल्ला केला. त्याने चिमुकल्याच्या डोक्यावर वरवंट्याने जोरदार प्रहार केले तसेच त्याच्या गुप्तंगावर आणि शरीरावर अमानुष मारहाण केली.
(नक्की वाचा- दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! शरद पवार,सुप्रिया सुळे PM मोदींच्या भेटीला; भेटीचं कारण आलं समोर)
चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू
गंभीर रक्ताळलेल्या आणि जखमी अवस्थेतील हुसनैनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईच्या केईएम (KEM) रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास चिमुकल्या हुसनैनची प्राणज्योत मालवली.
(नक्की वाचा- Doctors Using AI: भारतात निम्म्याहून अधिक डॉक्टर उपचारांसाठी वापरतात AI! सर्वेक्षणात धक्कादायक माहिती)
घटना लपवण्याचा प्रयत्न; आईचीही चौकशी
घटना घडल्यानंतर आरोपी विकास सिंह आणि बालकाची आई सकीना यांनी हे कृत्य लपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी माहिती देताना सांगितले की, "आरोपी विकास सिंह याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. बालकावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात आणि कृत्य लपवण्यात आई सकीना हिची काही मदत किंवा सहभाग होता का, या अँगलने देखील पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world