Ramleela : हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेल्या रामलीलेतून मुस्लीम कलाकार गायब!

दरवर्षी विजयादशमीला मुंबईतील अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने रामलीलेचं सादरीकरण केलं जातं. मात्र परिस्थिती सुधारली नाही तर येत्या काही वर्षांनंतर हे खेळ पाहणं दुर्मीळ होईल. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मुंबईतील रामलीलेचं (Ramleela) वेगळंच रूप पाहायला मिळत आहे. मात्र या नव्या रुपात मुस्लीम प्रेक्षक आणि कलाकार गायब होत असल्याचं दिसत आहे. यामुळे आयोजकांमध्ये निराशा आहे. दुसरीकडे लोकांमधील रामलीला पाहण्याची क्रेझ कमी होत आहे. त्यामुळे रामलीला पाहायला येणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 

स्टेजसमोरील रिकाम्या खुर्च्या आणि काही ठराविक प्रायोजकांमुळे आयोजक चिंतेत आहे. यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेली रामलीला बंद होते की काय अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत मुंबईत सादर केल्या जाणाऱ्या रामलीलेबाबतही असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. 

मुंबईतील सर्वात जुनी रामलीला दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदानात दाखवली जाते. साधारण 1958 पासून याचं सादरीकरण केलं जात आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे पुढील काही वर्षच रामलीलेचे सादरीकरण करणं शक्य होईल, अशी भावना आयोजकांकडून करण्यात आली. 

नक्की वाचा - Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व

क्रॉस मैदानात होणाऱ्या रामलीलाचे आयोजक सुरेश मिश्रा यांनी सांगितलं की, आयोजकांमधील मुस्लिमांचं प्रमाण अक्षरश: संपलं आहे. आतापर्यंत रामलीलेतील अधिकतर कलाकार मुस्लीम असत. मात्र आता हे प्रमाण नगण्य झालं असून अयोध्यातून कलाकारांना बोलावलं जातं. यामुळे खर्च वाढल्याचं त्यांनी सांगितलं. आधीच कार्यक्रम नीट होत नसताना हा खर्च वाढला आहे. त्याशिवाय सरकाराकडूनही काहीच मदत मिळत नाही. केवळ रामाचं नाव जपल्याने काय होईल? 

मुंबईतील आझाद मैदानातील रामलीला तब्बल 45 वर्ष जुनी आहे. सध्या मुस्लीम प्रेक्षक रामलीला पाहायला येताना दिसत नाही. मात्र हिंदू प्रेक्षकांचं प्रमाणही खूप कमी झालं आहे. त्यांना याबाबत फार रस नसल्याचं दिसतं, अशी भावना आझाद मैदानात रामलीला आयोजित करणारे त्रिंबक तिवारी यांनी सांगितलं. गेल्या आठ ते दहा वर्षांत खूप बदल झाल्याचं ते सांगतात. दरवर्षी विजयादशमीला मुंबईतील अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने रामलीलेचं सादरीकरण केलं जातं. मात्र परिस्थिती सुधारली नाही तर येत्या काही वर्षांनंतर हे खेळ पाहणं दुर्मीळ होईल. 

रामलीलेला युनेस्कोने 2008 मध्ये मानवाचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असल्याचं घोषित केलं होतं. जात, धर्म वा वयातील भेद बाजूला सारून संपूर्ण समाजाला एकत्र आणणाऱ्या पारंपरिक लोककलेचं हे बदलतं रूप मुंबईतील अनेक आयोजकांना निराश करतं.