Nagpur News: "नोकरीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावलं अन्...", नागपूरमधील धक्कादायक प्रकार

Nagpur Crime News: नागपूरमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घाट रोडवरील 'सिल्व्हर नेस्ट' हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून, आरोपी कार शोरूमचा मालक असल्याचे समजते.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागपुरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका प्रतिष्ठित कार शोरूम मालकाने नोकरी देण्याच्या बहाण्याने तरुणीला हॉटेलमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी त्याला पाठीशी घातल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

'सिल्व्हर नेस्ट' हॉटेलमधील थरार

काटोल रोड परिसरातील एका कार शोरूम मालकाने पीडित तरुणीला नोकरी संदर्भात चर्चा करण्यासाठी घाट रोडवरील 'सिल्व्हर नेस्ट' हॉटेलमध्ये बोलावले होते. असुरक्षित वाटल्याने पीडिता आपल्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन हॉटेलमध्ये पोहोचली.

Advertisement

आरोपीने तिघींनाही हॉटेलच्या खोलीत नेले. तिथे पोहोचताच आरोपीने पीडितेशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणींनी विरोध केला असता आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर पीडितेने आपल्या एका मित्राला फोन करून घटनास्थळी बोलावले आणि तातडीने 'डायल 112' वर पोलिसांना माहिती दिली.

(नक्की वाचा-  Baramati Election: बारामतीत तिरंगी लढत! काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात दिला तगडा उमेदवार; कोण-कोण मैदानात?)

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलवर धाव घेऊन चौकशी केली. मात्र, पीडितेच्या मते पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीत आरोपीवर सौम्य कलमे लावण्यात आली आहेत. "माझ्यासोबत घडलेला प्रकार गंभीर होता, पण पोलिसांनी अशी कलमे लावली आहेत ज्यामुळे आरोपीला सहज जामीन मिळू शकतो. यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढेल," अशी भीती पीडितेने व्यक्त केली आहे.

(नक्की वाचा-  Akola News: अकोल्यात 'या' भागात मोठी दहशत, धुरंधर पाहिल्यावर चाकू हल्ल्यांचा रिअल थरार, 8 तासानंतर गेम पलटला)

काय म्हणाले गणेशपेठ पोलीस?

गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. "आम्ही पीडितेच्या जबाबावरून गुन्हा नोंदवला असून हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करत आहोत. कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल," असे पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

नागपूरमध्ये नोकरीच्या नावाखाली तरुणींची होणारी ही फसवणूक आणि विनयभंगाच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

Topics mentioned in this article