योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News Today : अकोल्याच्या कौलखेड परिसरात काही अल्पवयीन मुलांसह तरुणांच्या टोळीने दिवसाढवळ्या चाकू आणि लोखंडी पाईपने हल्ले करत दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटनासमोर आली होती.दरम्यान,खदान पोलीस ठाणे हद्दीतील श्रद्धानगर,कौलखेड आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,खडकी परिसरात चाकू हल्ल्याच्या सलग तीन घटना घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
ही घटना काल शनिवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास घडलेल्या या घटनांमध्ये काही अल्पवयीन मुलांसह तरुणांच्या टोळीने नागरिकांना लक्ष्य करत अचानक हल्ला चढवला.चाकू आणि लोखंडी पाईपचा वापर करत नागरिकांना जखमी करण्यात आले.या घटनेची काही दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून त्यातून आरोपींची ओळख पटवण्यास पोलिसांना मदत झाली आहे.तर दुसरीकडे दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापही व्यक्त केला जात होता.
हल्ल्यात दोघे गंभीर,‘धुरंदर २' चित्रपटानंतर नशेत केला हल्ला
अकोल्याच्या कौलखेडमधील श्रद्धानगर परिसरात घडलेल्या या हल्ल्यात अभिलाष अरविंद हिंगे (३२)आणि रवि उर्फ छोटू ठाकरे (२४) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी अभिलाष हिंगे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून उपचार सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर तरुणांची टोळी नुकतीच “धुरंदर २” हा चित्रपट पाहून आली होती.त्यानंतर काही तरुण नशेत असल्याचेही समोर आले असून नशेच्या प्रभावात त्यांनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.तसेच अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढता कलही चिंतेचा विषय ठरत आहे.
पोलिसांची कारवाई; ८ तासांत सर्व आरोपी अटकेत
घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.सुरुवातीला दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर उर्वरित आरोपींचाही शोध घेत अवघ्या आठ तासांत सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत ‘सिन क्रिएशन' करून तपास प्रक्रिया पूर्ण केली.तसेच हल्लेखोर तरुणांची परिसरात परेड काढण्यात आली, जेणेकरून नागरिकांमधील भीती कमी होईल.या घटनेनंतर कौलखेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.मात्र नागरिकांच्या मते, खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांची संख्या अपुरी असल्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
पोलीस चौकीची मागणी; वाढत्या गुन्ह्यांमुळे चिंता
कौलखेड आणि आसपासच्या भागात नशेखोर तरुणांचा वाढता उपद्रव आणि वाढती गुन्हेगारी पाहता स्थानिक नागरिकांनी पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही भागात पोलीस चौक्या कार्यान्वित असल्या तरी अनेक ठिकाणी पोलीस चौकी नसल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याची चर्चा आहे. विशेषतः खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मलकापूर परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी यापूर्वी नगरसेवक पराग गवई आणि स्थानिक नागरिकांनी केली होती.मात्र अद्याप या मागणीवर ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा या घटनेच्या पार्श्वभूमीवर मलकापूर भागात पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी केली आहे.वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक कडक आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world