संजय तिवारी, नागपूर
नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी गुड न्यूज मिळाली आहे. कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 ते 30 जून 2024 या कालावधीतील 30 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार आहे. त्यामुळे, नागपूर मनपा कर्मचाऱ्यांसाठी येणारी दिवाळी गोड होणार असल्याचे आतापासून स्पष्ट झाले आहे.
सदर थकबाकी 15 हप्त्यात दिली जाणार असून कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या वेतनात थकबाकीचा पहिला हप्ता मिळणार आहे. नागपूर महानगरपालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकाच्या वित्त विभागाने थकबाकी देण्याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
(नक्की वाचा- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना; राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापूरातून आयोध्येसाठी जाणार)
राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशन इंटककडून याविषयी महानगरपालिका आयुक्त यांना याच महिन्यात शिष्टमंडळ भेटले होते. महाराष्ट्र शासन निर्णय अनुसार सुधारित वाहतूक भत्ता मिळावा आणि महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळीपूर्वी देण्यात यावी अशी 10 सप्टेंबर रोजी मागणी करण्यात आली होती.
महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या होत्या. या मागणीचा सहानुभूतीने विचार करू असे आयुक्तांनी त्यावेळी शिष्टमंडळाला सांगितले होते. त्यानंतर लगोलग चक्रे फिरली आणि आता परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आल्याने नागपूर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
(नक्की वाचा- अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या मतदारसंघावर भाजपचा दावा; 'नोटा'ला मतदान करण्याचा इशारा)
विधानसभेच्या निवडणुका असल्याने लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलल्याबद्दल संघटनेने आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचे आभार व्यक्त केले.