Nagpur News: निवडणूक ड्युटीवर गैरहजर राहणे भोवले; 9 शिक्षक अन् कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेदरम्यान निवडणूक ड्युटीवर गैरहजर राहिलेल्या 9 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा करणे काही कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. नागपूरमध्ये विशेष संक्षिप्त मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेदरम्यान निवडणूक कर्तव्यावर गैरहजर राहिल्याप्रकरणी नऊ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे निवडणूक विभागासह शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मतदार पुनरीक्षण (SIR) मोहिमेतील हलगर्जीपणा

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विशेष संक्षिप्त मतदार पुनरीक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील प्रक्रिया मानली जाते. या मोहिमेसाठी संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच 'बीएलओ' म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आदेश मिळूनही हे कर्मचारी ड्युटीवर हजर झाले नाहीत आणि त्यांनी आयोगाच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन केले.

Advertisement

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा

निवडणूक नोंदणी अधिकारी शिल्पा सोनाले तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी तात्काळ हजर राहण्याचे स्पष्ट आणि लेखी आदेश देण्यात आले होते. वारंवार सूचना देऊनही हे 9 कर्मचारी ड्युटीवर गैरहजर राहिले.

अखेर, नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार यांनी या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत सदर पोलिसांनी कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या नऊ जणांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व कायदा आणि इतर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

(नक्की वाचा-  Ranbir Kapoor Investment: रणबीर कपूर बनला पुणेकर! मुळशीतील 'या' गावात खरेदी केली तब्बल 25 एकर जमीन)

शासनाचा कडक इशारा

निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून यामध्ये कोणतीही शिथिलता किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे निवडणूक कामांना गांभीर्याने न घेणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी आता सदर पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.