राहुल वाघ, नाशिक
नाशिकच्या औद्योगिक आणि निवासी पट्ट्यात समाविष्ट असलेल्या अंबड परिसरातील दत्तनगर येथे बोअरवेलच्या पाण्यात अत्यंत घातक विषारी रसायने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दत्तनगरमधील पिवळ्या रंगाच्या बोअरवेलच्या पाण्याच्या नमुन्यांची एका खासगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.
या तपासणीत मानवी आरोग्यास अत्यंत घातक असणाऱ्या 'हेक्साव्हॅलेंट क्रोमियम'चे प्रमाण नियमानुसार निश्चित केलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल एक हजार पटींहून अधिक आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात त्वचेचे गंभीर विकार पसरत असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी हा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
आरोग्यावर भयंकर परिणाम अन् गोदावरी पात्राला धोका
पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या दूषित पाण्याच्या संपर्कामुळे नागरिकांमध्ये खालील गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
दूषित पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी किंवा दैनंदिन कामासाठी केल्यावर नागरिकांना खाज सुटणे, पुरळ उठणे आणि त्वचेचे संसर्ग होत आहेत. हेक्साव्हॅलेंट क्रोमियम हे एक अत्यंत घातक कार्सिनोजेनिक (कॅन्सर निर्माण करणारे) रसायन मानले जाते. याच्या दीर्घकालीन संपर्कामुळे यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांचे गंभीर आजार होऊ शकतात. हे अत्यंत विषारी पाणी स्थानिक नाल्यांच्या माध्यमातून थेट गोदावरी पात्रात मिसळत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली
नाशिकमध्ये आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची कामे प्रशासनाकडून सुरू असतानाच, गोदावरी नदीच्या मुख्य पात्रात विषारी रसायने मिसळत असल्याने पर्यावरण रक्षकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कुंभमेळ्यात देशभरातून कोट्यवधी भाविक गोदावरीत स्नानासाठी येतात, त्यामुळे हे प्रदूषण तातडीने न थांबवल्यास मोठे संकट ओढवू शकते.
पर्यावरणप्रेमींच्या प्रमुख मागण्या
- दत्तनगर आणि अंबड परिसरातील सर्व दूषित बोअरवेल प्रशासनाने तत्काळ सील कराव्यात.
- बाधित परिसरातील नागरिकांना टँकरद्वारे किंवा महापालिकेच्या पाइपलाइनद्वारे पिण्याचे आणि वापराचे सुरक्षित पाणी पुरवले जावे.
- औद्योगिक सांडपाणी भूगर्भात किंवा नाल्यात सोडणाऱ्या अंबड एमआयडीसीतील संबंधित कारखान्यांचा शोध घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.