जाहिरात

Maharashtra Kesari Final: एकाच गुरुचे 2 शिष्य भिडले, नाशिकचा हर्षवर्धन सदगिर ठरला ‘डबल महाराष्ट्र केसरी'

महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगिर यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगला. नाशिकचा हर्षवर्धन सदगिर डबल महाराष्ट्र केसरी झाला असून त्याने मानाची गदा जिंकली आहे.

Maharashtra Kesari Final:  एकाच गुरुचे 2 शिष्य भिडले, नाशिकचा हर्षवर्धन सदगिर ठरला ‘डबल महाराष्ट्र केसरी'
Maharashtra Kesari 2026 Winner
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Maharashtra Kesari 2026 Final Result : रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनातून पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोप सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. कुस्तीप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि जल्लोषमय वातावरणात हा समारोप सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. 68 व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने, तर गादी विभागात नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन सदगीरने दिमाखदार विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी आता सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात रंगतदार लढत झाली.विशेष म्हणजे, हे दोन्ही मल्ल अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले असून एकाच आखाड्यात सराव करणारे आहेत. त्यामुळे अंतिम सामना अधिकच उत्कंठावर्धक ठरला.

पहिल्या फेरीत दोघांनी 1-1 अशी बरोबरी केली

गादी विभागातील अंतिम फेरीत नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. सुरुवातीपासूनच खेमीची पकड घेत गुण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हर्षवर्धनने अवघ्या अडीच मिनिटांत तांत्रिक गुणांच्या आधारे जय पाटीलचा 10-0 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. त्याच्या अनुभवसंपन्न आणि अचूक खेळामुळे गादी विभागातील ही लढत एकतर्फी झाली.महाराष्ट्र केसरीच्या अंतिम कुस्तीला सुरुवात होताच महेंद्रने आक्रमक खेळाला सुरवात केली. त्यामध्ये महेंद्र याला 1 गुण देण्यात आला. हर्षवर्धन याने शांत आणि संयमी खेळ करत महेंद्र याचे आक्रमण थोपवत होता. महेंद्र याने धोबीची पकड करण्याचा प्रयत्न हर्षवर्धन याने धुडकावून लावली. हर्षवर्धन याने हप्ते डावाची पकड केली पण गुण मिळवता आला नाही. पहिल्या फेरीत दोघांनी 1-1 अशी बरोबरी गाठली. 

नक्की वाचा >> Pune News: 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात,CM फडणवीसांनी स्पर्धेकडे फिरवली पाठ, कारण काय?

आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील काय म्हणाले?

दुसऱ्या फेरीत महेंद्र याने पटाला लागण्याचा प्रयत्न केला पण गुण मिळवता आला नाही. महेंद्र याला निष्क्रियता असल्याचे सांगत 1 गुण हर्षवर्धन याला देण्यात आला. त्यानंतर हर्षवर्धन याने पटाला लागत 2 गुण मिळवला. आणि हर्षवर्धन याने महेंद्र याचा 4-3 असा पराभव करीत डबल महाराष्ट्र केसरीचा 'किताब पटकावला.स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांनी, “केवळ 37 दिवसांत ही स्पर्धा भरवण्याचे शिवधनुष्य आम्ही उचलले आणि ते वाघोली ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शक्य झाले. विजेत्या मल्लांना भरघोस पारितोषिक देण्याचा आमचा मानस पूर्ण झाला. कुस्तीची ग्रामीण चौकट मोडून ती शहरात आली पाहिजे. कॉर्पोरेट क्षेत्रानेही कुस्तीला राजाश्रय द्यावा, हा या स्पर्धेमागचा हेतू आहे,” असे सांगितले.

नक्की वाचा >> राज्यातील हॉटेल व्यवसायिकांसाठी आनंदाची बातमी! LPG Gas पुरवठ्याबाबत सरकारने घेतला सर्वात महत्त्वाचा निर्णय

शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, “लहानपणापासून मुलांमध्ये खेळाची आवड आणि संस्कार रुजावेत यासाठी विशेष क्रीडा शाळा सुरू करण्यात येणार आहेत.” त्यांनी आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या नियोजनाचे कौतुक केले.आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके म्हणाले, “आजपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांनीच कुस्तीमध्ये मोठी पदके जिंकली आहेत. पुण्यातील बालेवाडी, डोणजे येथील क्रीडांगणांप्रमाणेच लोणीकंद येथेही भव्य, उच्च तांत्रिक क्रीडांगण उभे राहणे महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे.” कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही आयोजकांचे कौतुक करत, “अतिशय भव्य मैदान उभारण्यात आले आहे. याच मैदानातून भविष्यात ऑलिम्पिकपटू घडतील. कुस्तीपटूंना येणाऱ्या अडचणींमध्ये सरकार पाठीशी असून सर्वतोपरी मदत करण्यात येईल,” अशी ग्वाही दिली.

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगिर काय म्हणाले?

"2020 ला जिंकल्यानंतर मी नोकरी मागितली होती. शिंदे साहेबांची भेट घेतली होती. मला त्यावेळी नोकरी दिली नाही. आता मला नोकरी नको. त्यावेळी मला पैलवान म्हणून देखील गृहीत धरलं नाही.काका पवार यांच्याकडे शिकलो.काही लोकांनी मला पैलवान नाही म्हणून जमा केलं होतं.गेले सात महिने मी पंजाब मध्ये कुस्ती करत होतो. शिकत होतो.मला स्वतःला सिद्ध करायचं होतं, आज करून दाखवलं", अशी प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगिरने माध्यमांशी बोलताना दिली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com