निलेश वाघ, प्रतिनिधी
Nashik Heavy Rain: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गड आणि परिसरात मंगळवारी (7 जुलै) सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे गडाच्या घाटात दरडी आणि दगड कोसळण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सप्तशृंगी देवीचे मंदिर पुढील तीन दिवसांसाठी (7 जुलै ते 9 जुलै) दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तसेच गडाकडे जाणारा घाट रस्ताही सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तीन दिवस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
घाटाच्या पायथ्याशी पोलिसांचा बंदोबस्त
धोकादायक परिस्थिती लक्षात घेता पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. गडाच्या पायथ्याशी पोलिसांनी चोख बॅरिकेडिंग केले असून घाट रस्त्याने वर जाणारी सर्व वाहतूक थांबवण्यात आली आहे. या ठिकाणी 24 तास पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, कोणत्याही वाहनाला गडावर जाण्याची परवानगी नाही. केवळ आपत्कालीन सेवांनाच या काळात मुभा असणार आहे.
प्रशासनाचे भाविकांना नम्र आवाहन
पावसाचा जोर आणि डोंगरातून दगड गोठण्याची शक्यता पाहता, पुढील तीन दिवस भाविकांनी सप्तशृंग गडावर येणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: Nashik News: नाशिकवरचे संकट टळले! पालघरमध्ये थैमान घालणारा 'पावसाचा भोवरा' गुजरातकडे सरकला)
नाशिक आणि त्रंबकेश्वर परिसरातील पर्यटकांची विशेष खबरदारी घ्यावी: CM देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (6 जुलै) सांगितले होते की, अरबी समुद्रावर तयार होत असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात 7 जुलै रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस बऱ्यापैकी त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सुमारे 300 मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनाने सज्ज राहून सखल भागात पाणी साचणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. कुठेही जीवितहानी होणार नाही, याबाबतही दक्ष रहावे.
ही परिस्थिती लक्षात घेता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी. बंद होऊ शकणारे रस्ते, दरडी कोसळण्याची ठिकाणी अशा सर्वंकष बाबींचा विचार करून पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे. पुढील काही दिवस त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पर्यटकांनी जावू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.