निलेश वाघ, मनमाड
Nashik News: नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये वाहतूक कोंडीमुळे एका गर्भवती ऊसतोड महिलेला अत्यंत हाल सोसावे लागले. वेळेवर रुग्णालय न गाठता आल्यामुळे या महिलेची रिक्षातच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नंदुरबारच्या केळीपणी येथील ऊसतोड कामगारांचे वाहन मनमाडमार्गे जात असताना महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना मजीला आवेश वडवे या गर्भवती महिलेला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. रुग्णालय जवळ असतानाही वाहतूक कोंडीमुळे तिथे पोहोचणे अशक्य झाले होते.
(नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: फॉर्ममधील एक प्रश्न अन् लाखो महिला अपात्र! लाडकी बहीण लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली)
रिक्षाचालक आणि कार्यकर्त्याची धाव
या कठीण प्रसंगी रिक्षाचालक अमजद अत्तर यांनी माणुसकी दाखवत पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना आपल्या रिक्षात बसवले. मात्र, रस्ता पूर्णपणे ब्लॉक असल्यामुळे रिक्षा पुढे सरकत नव्हती. सामाजिक कार्यकर्ते रितेश पगारे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपल्या दुचाकीवरून रिक्षाच्या पुढे जाऊन रस्ता मोकळा करून दिला. रस्ता मोकळा करून रुग्णालय गाठेपर्यंत उशीर झाला होता आणि रस्त्यातच रिक्षात महिलेची प्रसूती झाली.
(नक्की वाचा- Pune News: पुण्यात 'मुले पळवणारी टोळी' सक्रिय? पुणे पोलिसांचे नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी)
माता आणि बाळ सुखरूप
सुदैवाने, रिक्षाचालक अमजद अत्तर आणि रितेश पगारे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रसूतीनंतर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते सुखरूप आहेत. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर आणि महामार्गावरील वाहतूक कोंडीवर संताप व्यक्त केला जात आहे.