Nashik News : धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मासात जावईबापूंचा रुबाब काही औरच असतो. सासरवाडीत मानपान.. सोन्याची अंगठी किंवा दागिना. मात्र हा धोंड्याच्या महिनातील प्रवास जावईबापूंसाठी त्रासदायक ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकच्या एका जावयाने धोंड्याच्या महिन्यातील आपला अनुभव सांगितला.
जालना ते छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर पेट्रोल पंपाची बोंबाबोंब
नाशिकच्या हिरावाडीत राहणारे हॉटेल व्यावसायिक रामेश्वर मेंगडे. त्यांची सासुरवाडी जालन्याची. मग काय धोंड्याच्या सणाला जावईबापू गेले सासुरवाडीला. जावयांचा पाहुणचार तर तुफान झाला. पुरणपोळीचा ढेकर देत जावईबापूंनी घरी जाण्यासाठी नाशिकच्या दिशेनं गाडी दामटली. मात्र जावईबापूंना साधं पेट्रोल किंवा सीएनजीसुद्धा मिळेना. इंधनाअभावी रस्त्यात गाडीचाच घसा कोरडा पडला आणि जावईबापूंची धांदलउडाली. आता जालना ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर एक दोन नाही तर तब्बल सात ते आठ पेट्रोल पंप आहेत. मात्र ते पंप असे झोपले होते जणू त्यांनाच धोंड्याची सुट्टीच लागली आहे. कुठं पेट्रोलची बोंब, तर सीएनजीचा पत्ताच नाही. लोकं रात्रभर पंपावर मुक्कामाला होती. भल्या पहाटेपासून शेतकरी गडी हातात कॅन घेऊन दुधाच्या रांगेसारखे पंपावर उभे. टँकर कधी येणार आणि पंप कधी चालू होणार, हे सगळंच रामभरोसे. हे पाहून मेंगडे कुटुंबाच्या पोटात गोळा आला
गाडीपेक्षा बैलगाडी बरी अशी गत...
शेवटी एकदाचा का छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सीएनजी पंप सुरु दिसला आणि मग काय जावईबापूंच्या जीवात जीव आला. मात्र इथंही गोंधळ कायम...पंपावर दीड किलोमीटरची लांब रांग. दीड-दोन तास रांगेतल्या तपश्चर्येनंतर कुठं गाडीच्या पोटात सीएनजी गेला. भल्या पहाटे 5 वाजता जालन्यावरुन निघालेले जावईबापू नाशिकला पोहोचले दुपारच्या 1 वाजता. समृद्धी महामार्गावरून साडेतीन-चार तासात सुस्साट जाणारी गाडी. मात्र इंधनाच्या टंचाईमुळे चक्क आठ तासांनी नाशिक मुक्कामी पोहोचली. म्हणजे गाडीपेक्षा बैलगाडी बरी अशी गत झाली!
जावईबापू गेले धोंड्याच्या सणाला.. मात्र मनस्तापच झाला... हा धोंड्याचा सण जावईबापू कधीच विसरणार नाहीत. तर , इंधनटंचाईचा फटका आता फक्त शेतकरी, व्यापारी किंवा सर्वसामान्यांनाच नाही, तर सासुरवाडीला जाणाऱ्या जावयांनाही बसायला लागलाय. धोंड्याच्या महिन्यात सासुरवाडीचा पाहुणचार तर एकदम गोड झाला, पण परतीच्या प्रवासात रिकाम्या पेट्रोल पंपांनी जावयाला कडू कारलं भरवलंय! आता राज्यातलं हे इंधनाचं संकट लवकर दूर नाही झालं, तर पुढच्या वेळी जावईबापूंना सासुरवाडीला जाण्यासाठी एसटीचा किंवा बैलगाडीचाच आसरा घ्यावा लागेल.