जाहिरात

Nashik Rain : अवघ्या 4 दिवसात नाशिकचं चित्र पालटलं; मराठवाड्यालाही मोठा दिलासा मिळणार!

जून महिना कोरडा गेल्यानंतर नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची भीती व्यक्त केली जात होती.

Nashik Rain : अवघ्या 4 दिवसात नाशिकचं चित्र पालटलं; मराठवाड्यालाही मोठा दिलासा मिळणार!

Nashik Rain News : जून महिना कोरडा गेल्यानंतर नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची भीती व्यक्त केली जात होती. शेतकरी चिंतेत होता. पण जुलैमध्ये झालेल्या पावसानं फक्त चार दिवसात नाशिकचं चित्र पालटलं. 2019 नंतर पहिला मोठा पूर नाशिककरांनी अनुभवलाय. नाशिकमधली धरणं भरल्यानं मराठवाड्यालाही काहीसा दिलासा मिळाला आहे. आठवडाभरात नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

जून कोरडा गेला, पण... 

धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आल्यानं गोदावरी नदी दुथडी भरुन वाहू लागली होती. महत्वाचं म्हणजे 1969, 2008 आणि 2019 नंतर पहिल्यांदाच गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. गोदावरीनं रौद्ररुप धारण केलं. नाशिक शहरात भांडी बाजारासह नदीकाठच्या अनेक भागात पाणी शिरलंय. फक्त चांदोरीच नाही तर सायखेड्यासह 8 गावांना पुराचा वेढा पडला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, दिंडोरी आणि पेठ तालुक्यांत मुसळधार पावसानं नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक छोटे पूल पाण्याखाली गेलेत, काही गावांचा संपर्क तुटलाय. निफाड आणि सिन्नरला जोडणारा पूल तिसऱ्या दिवसापर्यंतही पाण्याखालीच होता. 

नक्की वाचा - चित्रपटाच्या शूटिंगसाठी साई बाबांच्या समाधीवरच..., ग्रामस्थ संतापले, 'ती' दृश्य वगळण्याची मागणी

जिल्ह्यातील धरणसाठा चार दिवसात 54 टक्क्यांवरुन 79 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 23 पैकी 7 धरणं भरली आहेत. तर 9 धरणांमध्ये 70 टक्क्याहून अधिकचा पाणीसाठा जमा झाला आहे. नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसानं मराठवाड्यालाही मोठा दिलासा मिळणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा?

दारणा - 88.82
मुकणे - 56.20
वाकी - 50.60
भाम - 100
भावली - 100
वालदेवी - 100
गंगापूर - 87.21
कश्यपी - 91.4
गौतमी गोदावरी - 92.61
कडवा - 82.46
आळंदी - 98.4
भोजापूर - 100
पालखेड - 59
करंजवण - 68
ओझरखेड - 100
वाघाड - 77.19
तिसगाव - 75
पुणेगाव - 66
चणकापूर - 74.50
हरणबारी - 100
केळझर - 100

चार दिवसाच्या पावसानं नाशिकचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. दुसरीकडे धरणं भरल्यानं पाण्याची चिंता मिटलीय. चिंताग्रस्त मराठवाड्यालाही या पावसानं काहीसाचा दिलासा मिळाला आहे. पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर धरणातील विसर्गही टप्प्याटप्प्यानं कमी केला जात आहे. त्यामुळे पूरस्थिती ओसरत असली तरी प्रशासन अजून सतर्क आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com