प्रांजल कुलकर्णी
जिद्द आणि देवावर श्रद्धा असेल तर माणूस काय करू शकतो याचं एक उदाहरण नाशिकमध्ये समोर आलं आहे. नाशिकच्या 40 वर्षीय व्यक्तीने हजयात्रा जवळपास 8 हजार किलोमीटर पायी चालत पूर्ण केली आहे. यासाठी त्यांना तब्बल अकरा महिन्यांचा कालावधी लागलाय. पाकिस्तानने व्हिजा नाकारल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र इराण, इराक मार्गे त्यांनी मक्का गाठले होते. भारताची किंमत काय आहे, हे दुसऱ्या देशात गेलं की कळते असं ते अभिमानाने सांगतात.
सोपा नव्हता प्रवास
हजयात्रा ईस्लाम धर्मात अत्यंत पवित्र समजली जाते. शक्य झाल्यास प्रत्येक मुस्लिमाने आयुष्यात एकदा तरी या यात्रेला जावे असा कुराणमध्ये उल्लेख आहे. या यात्रेसाठी भाविक जगभरातून सौदी अरेबिया देशातील मक्का शहरात लाखोंच्या संख्येने पोहोचत असतात. मात्र पेंटरकाम करणाऱ्या एका 40 वर्षांच्या भाविकाने ही हजयात्रा नाशिकपासून चक्क पायी चालत पूर्ण केली आहे. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. अली शहबाज सय्यद असं या भाविकाचं नाव असून ते नाशिकच्या शाहू नगर परिसरातील रहिवासी आहेत. 3 जुलै 2023 रोजी भद्रकाली परिसरातील बडी दर्गापासून त्यांनी या पदयात्रेस सुरुवात केली होती. हा संपूर्ण प्रवास तसा सोपा नव्हता. प्रवासाला निघताना कुटूंबाला अश्रू अनावर झाले होते. मात्र सर्व अल्लावर सोडून सोबत फक्त कपड्यांची बॅग आणि झोपण्यासाठी गादी घेऊन ते पुढे मार्गस्थ झाले होते.
अखेर प्रवासाला सुरुवात
अली शहबाज सय्यद हे 2003 साली अजमेरला सायकलवर गेले होते. त्यानंतर 20 वर्षांपासून त्यांचे स्वप्न होते की पायी हजयात्रा करण्याचे. केरळचा एक माणूस जाणार असल्याचे त्यांनी मोबाईलवर पाहीले होते. त्यानतंर त्याचा विश्वास वाढला. त्यांनी पत्नीला विचारले पायी जावू का? त्यावर पत्नीने त्यांना सांगितले जसे जाल तसेच परत या. सगळ्यांनी टेन्शन घेतले होते. रडायला लागले होते. त्यांनी सांगितले की मृत्यू हा कधीही येवू शकतो. आपल्या हातात काही नाही. त्यांनी सर्व कागदपत्र गोळा केली त्यानंतर त्यांना आपला प्रवास सुरू केला.
पाकीस्तानने व्हिजा नाकारला
नाशिकहून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर दिंडोरी, पेठ, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा मार्गे ते पाकिस्तानात गेले. मात्र पाकिस्तान सीमेवर पोहोचताच त्यांना अडवण्यात आले. तुम्ही भारताचे आहात. त्यातच आता वातावरण खराब आहे. तुमच्या जीवाला काही झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असं म्हणत त्यांना पाकिस्तान सैनिकांनी त्यांना व्हिजा देण्यास नकार दिला. पाकिस्तानने व्हिसा देण्यास नकार दिल्याने अली यांच्या समोर मोठी समस्या निर्माण झाली. सर्व प्रवासाची दिशा त्यांची भरकटली गेली होती. त्यानंतर ते 7 ऑक्टोबरला विमानाने इराणला गेले. त्यानंतर परत पायी प्रवास सुरू केला. तिथून इराक, कुवेतमार्गे ते सौदीत पोहोचले. रात्री साप वगैरे दिसायचे. शिवाय दोन लोकांनी त्यांना पकडले होते. पण भारतातून पायी चालत आलो आहे असे सांगताच त्यांना एका हॉटेलवर व्यवस्था केली. ते दोघेही चोर होते असे अली सांगतात. इराणमध्ये खूप भयानक तापमान होते. भूक तहान लागायची. एकदा एक कारवाला अचानक येऊन थांबला. त्यानंतर तो अली यांच्यावर संतापला. कुठे आला. कुठे चालला असे विचारत पासपोर्ट घेतला. पण भारतातून आलो आहे हे सांगितल्यानंतर त्याने त्याचा डबा खायला दिला. शिवाय एक लाख रुपये दिले आणि दुवा करायला सांगितली. विशेष म्हणजे ती व्यक्ती आर्मीची अधिकारी होती.
अनेकांनी दिला मदतीचा हात
रात्री दर्गा, मशीद किंवा जिथे जागा मिळेल तिथे ते झोपी जायचे. या सर्व प्रवासात त्यांच्या मदतीसाठी अनेक हातही धावून आले. अखेर सगळ्या संकटाचा सामना करत करत मे 2024 मध्ये ते मक्कामध्ये पोहोचले. 16 जूनला त्यांनी आपली हजयात्रा पूर्ण केली. मक्का इथं पोहोचलो तेव्हाची ती भावना शब्दात सांगू शकत नाही असे अली सांगतात. देशात सुख, समृद्धी आणि शांती रहावी अशी प्रार्थना त्यांनी केली. या प्रवासात अली यांच्या गळ्यात तिरंगा होता. भारतीय असल्याचं समजताच लोक त्यांना सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्याबाबत विचारत होते.
11 महिन्यानंतर नाशिकला परतले
संपूर्ण वर्षभराची त्यांची ही तीर्थयात्रा होती. नाशिकच नव्हे तर कदाचित महाराष्ट्रातीलच हजयात्रेला पायी जाणारे अली शहबाज सय्यद हे एकमेव व्यक्ती असावेत. मक्कावरून मुंबईत ते विमानाने आले. मात्र त्यांनी मुंबई ते नाशिक पुन्हा पायपीट केली. ही पायपीट म्हणजे आपली हजयात्रा पूर्ण झाल्याचा त्यांचा तो आनंद होता. अल्लाचे त्यांनी या माध्यमातून आभार मानले. सोमवारी दुपारी नाशिकला ते परतले आणि जिथून या यात्रेला त्यांनी सुरुवात केली होती, त्या बडी दर्गामध्ये मक्कहून आणलेली चादर त्यांनी चढवत आपला प्रवास थांबवला. सायंकाळी आपल्या घरी परतताच परिसरातील नागरिकांसह कुटुंबाने फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world