प्रथमेश गडकरी, नवी मुंबई
आगामी महापालिका निवडणुकांआधी नवी मुबंईत काँग्रेसला मोठे खिंडार पडलं आहे. नवी मुंबईतील काँग्रेसचे बडे नेते रमाकांत म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. वाशीतील खासदार जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईत आले होते.
यावेळी ऐरोली येथील विबग्योर शाळेच्या मैदानात आयोजित एका कार्यक्रमात रमाकांत म्हात्रे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे गेल्या काही दिवसांपासून रमाकांत म्हात्रे नाराज होते. नवी मुंबई काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांची निवड झाल्यानंतर रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज रमाकांत म्हात्रे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हात्रे आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले आहे. रमाकांत म्हात्रेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे नवी मुंबई काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे.