Navi Mumbai International Airport : मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाची नवी गाथा लिहिण्यासाठी सज्ज होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) उद्घाटनाची तारीख निश्चित झाली आहे. सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 30 सप्टेंबर रोजी या भव्य विमानतळाचे लोकार्पण होणार असून, नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी या विमानतळाची तुलना थेट लंडनच्या 'हीथ्रो' विमानतळाशी करून त्याच्या भव्यतेची ग्वाही दिली आहे.
विशेष म्हणजे, नवी मुंबईतील हे विमानतळ पहिल्यांदाच जलमार्गाने गेटवे ऑफ इंडिया किंवा इतर ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी जलजेट्टीशी जोडले जाईल, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.
कसे असेल विमानतळ?
उलवे, पनवेलजवळ 1,160 हेक्टरपेक्षा जास्त भूभागावर उभारलेले हे विमानतळ जागतिक दर्जाच्या सेवा-सुविधांनी सुसज्ज आहे. पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यावर, या विमानतळाची दरवर्षी 9 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अधिकृत सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार, या विमानतळाची एक खास ओळख म्हणजे इथे वॉटर जेट्टीची सुविधाही असेल. यामुळे प्रवाशांना जलमार्गाने गेटवे ऑफ इंडिया किंवा इतर ठिकाणी जाता येईल.