जाहिरात

Navi Mumbai Airport : लंडनच्या ‘हीथ्रो’ प्रमाणे भव्य... नवी मुंबई विमानतळाचे 'या' तारखेला उद्‌घाटन

Navi Mumbai Airport : लंडनच्या ‘हीथ्रो’ प्रमाणे भव्य...  नवी मुंबई विमानतळाचे 'या' तारखेला उद्‌घाटन
Navi Mumbai International Airport : या विमानतळाची तुलना थेट लंडनच्या 'हीथ्रो' विमानतळाशी होत आहे.
मुंबई:

Navi Mumbai International Airport : मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाची नवी गाथा लिहिण्यासाठी सज्ज होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA)  उद्‌घाटनाची तारीख निश्चित झाली आहे. सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 30 सप्टेंबर रोजी या भव्य विमानतळाचे लोकार्पण होणार असून, नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी या विमानतळाची तुलना थेट लंडनच्या 'हीथ्रो' विमानतळाशी करून त्याच्या भव्यतेची ग्वाही दिली आहे.

 विशेष म्हणजे, नवी मुंबईतील हे विमानतळ पहिल्यांदाच जलमार्गाने गेटवे ऑफ इंडिया किंवा इतर ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी जलजेट्टीशी जोडले जाईल, असे सिंघल यांनी स्पष्ट केले.

कसे असेल विमानतळ?

उलवे, पनवेलजवळ 1,160 हेक्टरपेक्षा जास्त भूभागावर उभारलेले हे विमानतळ जागतिक दर्जाच्या सेवा-सुविधांनी सुसज्ज आहे. पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यावर, या विमानतळाची दरवर्षी 9 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अधिकृत सोशल मीडिया हँडलवरील पोस्टनुसार, या विमानतळाची एक खास ओळख म्हणजे इथे वॉटर जेट्टीची सुविधाही असेल. यामुळे प्रवाशांना जलमार्गाने गेटवे ऑफ इंडिया किंवा इतर ठिकाणी जाता येईल.

( नक्की वाचा : Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 'टेक ऑफ' साठी सज्ज, आतील वैशिष्ट्यांची A to Z माहिती )

CSMIA वरील ताण कमी होणार

या नवीन विमानतळामुळे सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) ताण कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः पुणे, नाशिक, रायगड आणि कोकण पट्ट्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हे विमानतळ सोयीचे ठरेल. त्यामुळे, ठाणे, नवी मुंबई, रायगड, कोकण, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला अधिक बळ मिळेल, अशी आशा आहे.

अटल सेतूमुळे प्रवास सुकर

नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते वाहतूक हा मुख्य पर्याय आहे. दक्षिण मुंबईतून सायन-पनवेल महामार्गाने येथे पोहोचता येते, तर पश्चिम उपनगरांतील प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्रीवेचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, अटल सेतू मार्ग (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) हा सर्वात वेगवान आणि सोयीचा मार्ग ठरेल. 22 किलोमीटर लांबीचा हा पूल शिवडी आणि न्हावा शेवाला जोडतो, ज्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर खूप कमी झाले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com