
Navi Mumbai Airport: गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. हे केवळ एक नवीन एअरपोर्ट नसून, मुंबईच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर ‘जुळ्या विमानतळांच्या' मॉडेलमुळे, हे एअरपोर्ट क्षमता, कनेक्टिव्हिटी आणि सोयीच्या बाबतीत जगातील दुबई, लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या सर्वोत्तम विमातळांच्या यादीत याचा समावेश होणार आहे.
मुंबईला आता दोन विमानतळांचा फायदा
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसाठी आता विमान वाहतुकीचे एक नवे पर्व सुरू होत आहे. NMIA चे धोरणात्मक स्थान नवी मुंबईतील उलवे आणि पनवेलजवळ आहे. यामुळे मुंबई आता दुबईच्या DXB-DWC, लंडनच्या हिथ्रो-गॅटविक, आणि न्यूयॉर्कच्या JFK-नेवार्क यांसारख्या शहरांच्या ‘जुळ्या विमानतळ' मॉडेलच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.
गेली अनेक वर्षे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) वार्षिक 50 दशलक्षाहून अधिक प्रवाशांना हाताळत आहे. मर्यादित जागा आणि एकाच धावपट्टीमुळे ही क्षमता मर्यादित होती. यामुळे शहराला दुसऱ्या आंतरराष्ट्रीय केंद्राची तातडीने गरज होती, जी NMIA आता पूर्ण करत आहे. NMIA आणि CSMIA यांच्यातील वाहतूक वितरित करून, प्रवाशांना जास्त एअरलाइन आणि मार्गांचे पर्याय मिळतील, तसेच कामाचा ताण कमी होईल. भविष्यात, रस्ते, मेट्रो आणि जलमार्गांसारख्या मल्टी-मोडल वाहतूक व्यवस्थेद्वारे दोन्ही एअरपोर्ट्स जोडले जातील, ज्यामुळे मुंबईची पायाभूत सुविधा जगातील प्रमुख शहरांसारखी होईल.
( नक्की वाचा : Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल मोठी अपडेट, अभूतपूर्व कनेक्टीव्हिटी गेम चेंजर ठरणार )
आधुनिक सुविधांनी सज्ज
NMIA च्या पहिल्या टप्प्यात टर्मिनल 1 सुरू होणार आहे, जे दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी हाताळण्यास सक्षम असेल. कमळापासून प्रेरणा घेऊन डिझाइन केलेल्या या टर्मिनलमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा भरपूर वापर करण्यात आला आहे. हे डिझाइन भारतीय संस्कृती आणि आधुनिक महत्त्वाकांक्षेचा संगम यामध्ये दाखवण्यात आला आहे.
कसं असेल टर्मिनल?
- स्वयंचलित किओस्क आणि बायोमेट्रिक तपासणीसह अत्याधुनिक चेक-इन झोन.
- जगातील सर्वात वेगवान असल्याचा दावा केलेली बॅगेज क्लेम प्रणाली.
- मोठे वेटिंग लाउंज आणि प्रगत स्कॅनिंगसह स्मार्ट सुरक्षा तपासणी.
- गुंतवणूक: ₹16,000+ कोटी
- टर्मिनल्सची संख्या: 2032 पर्यंत 4
- कमाल क्षमता: 90 दशलक्ष प्रवासी/वर्ष (NMIA)
- कार्गो क्षमता: पहिल्या टप्प्यात 0.8 दशलक्ष टन/वर्ष
- जनरल एव्हिएशन टर्मिनल: भारतातील सर्वात मोठे, सुमारे 75 स्टँड्स
2032 पर्यंत, NMIA मध्ये एकूण चार टर्मिनल्स असतील, ज्यांची एकूण क्षमता वर्षाला 90 दशलक्ष प्रवाशांची असेल. या सुविधांमुळे प्रवासाची प्रक्रिया अधिक सोपी होईल. केवळ टर्मिनलच नाही, तर NMIA मध्ये रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि लॉजिस्टिक्स हब्ससह एक 'एअरो सिटी' देखील तयार केली जात आहे, ज्यामुळे हे एअरपोर्ट स्वतःच एक परिपूर्ण आर्थिक केंद्र बनेल.
प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी नवा मापदंड
NMIA मध्ये प्रवाशांना सुखद अनुभव देण्यासाठी खास लक्ष दिले आहे. टर्मिनल्सच्या आतमध्ये मोकळेपणा, कलाकृती आणि हिरवळ असेल. लाउंजमधून धावपट्टीचे मनोहारी दृश्य दिसेल आणि जेवणासाठी मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडपासून ते आंतरराष्ट्रीय पदार्थांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असतील. येथे मोफत वाय-फाय, कौटुंबिक लाउंज, बिझनेस पॉड्स आणि डिजिटल नेव्हिगेशन टूल्स अशा अनेक सुविधा उपलब्ध असतील.
प्रवाशांव्यतिरिक्त, NMIA मालवाहतुकीसाठी देखील एक मोठे केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. सुरुवातीला वार्षिक 800,000 टन माल हाताळण्याची क्षमता असेल. मुंबईच्या औषधनिर्मिती, नाशवंत वस्तू आणि ई-कॉमर्सच्या क्षेत्रासाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
कॉर्पोरेट प्रवासासाठी, NMIA मध्ये भारतामधील सर्वात मोठे जनरल एव्हिएशन टर्मिनल असेल, ज्यात सुमारे 75 बिझनेस जेट स्टँड्स आणि हेलिपॅडची व्यवस्था असेल. याव्यतिरिक्त, प्रगत देखभाल सुविधा आणि अत्याधुनिक ATC (एअर ट्रॅफिक कंट्रोल) टॉवरमुळे सुरक्षितता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देण्यात आले आहे.
( नक्की वाचा : MHADA News : सर्वात मोठी पुनर्विकास योजना; गोरेगावच्या रहिवाशांना ‘जॅकपॉट' लागला; 1600 चौरस फूट घर मिळणार )
जागतिक स्तरावर मुंबईची ओळख
NMIA–CSMIA यांच्या जोडीमुळे मुंबई आता दुबई, लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या शहरांच्या तुलनेत उभी राहील. आज दुबई इंटरनॅशनल (DXB) दरवर्षी 90 दशलक्षाहून अधिक प्रवाशांना हाताळते. लंडनचे नेटवर्क 180 दशलक्ष आणि न्यूयॉर्क सुमारे 130 दशलक्ष प्रवासी हाताळते. 2032 पर्यंत, NMIA आणि CSMIA ची एकत्रित क्षमता 150-160 दशलक्ष प्रवाशांपर्यंत पोहोचेल, ज्यामुळे मुंबई जगातील प्रमुख एअरपोर्ट हब्समध्ये स्थान मिळवेल.
या धोरणामुळे केवळ हवाई वाहतुकीची क्षमता वाढत नाही, तर रोजगार, पर्यटन, कॉर्पोरेट गुंतवणूक आणि रिअल इस्टेटच्या विकासालाही चालना मिळेल. देशांतर्गत IndiGo आणि Akasa Air सारख्या कंपन्यांनी येथे कामकाज सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे, तर आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सही भारताच्या वाढत्या विमान वाहतूक क्षेत्राकडे आकर्षित होतील.
टेक-ऑफसाठी सज्ज
NMIA ची सुरुवात भारताच्या पायाभूत सुविधांच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. हे एअरपोर्ट प्रवाशांसाठी जलद आणि स्मार्ट प्रवास सुनिश्चित करेल, तर व्यवसायांसाठी विकासाचे नवीन मार्ग खुले करेल. मुंबईसाठी, हे शहर जगातील एका महान 'जुळ्या विमानतळ प्रणाली'चे भाग बनणार आहे. उद्घाटनाची वेळ जवळ येत असताना, NMIA टेक-ऑफसाठी सज्ज आहे—जे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक नवीन अध्याय सुरू करेल.
SOURCE: AAHL
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world