Navi Mumbai News: नवी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा! सिग्नलवरील यंत्रणेत होणार मोठे बदल

Navi Mumbai News: नवी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था हायटेक करण्यासाठी 58 महत्त्वाच्या चौकांमध्ये 'इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (ITMS) या अत्याधुनिक प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

नवी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी नवी मुंबईत अत्याधुनिक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील 58 महत्त्वाच्या चौकांवर आणि प्रमुख वाहतूक मार्गांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणाली बसवण्यात येणार असून वाहतूक नियंत्रणासाठी केंद्रीकृत कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येणार आहे.

प्रकल्पाबाबत माहिती देताना कंपनीचे प्रतिनिधी करण आणि कुशल यांनी सांगितले की, हा उपक्रम नवी मुंबईच्या शहरी वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपरिक आणि प्रतिसादात्मक वाहतूक व्यवस्थेऐवजी डेटा-आधारित, तात्काळ निर्णय घेणारी आणि केंद्रीकृत नियंत्रणाखाली काम करणारी स्मार्ट प्रणाली विकसित केली जात आहे.

Advertisement

सिग्नलवर विनाकारण थांबण्याचा त्रास होणार कमी

या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अॅडॉप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम (ATCS). पारंपरिक सिग्नल ठराविक वेळेनुसार चालतात. मात्र नवीन प्रणाली रिअल-टाईममध्ये वाहनांची संख्या आणि वाहतुकीची घनता ओळखून सिग्नलचा कालावधी आपोआप बदलणार आहे. त्यामुळे चौकात वाहतूक नसताना वाहनचालकांना लाल दिव्यावर विनाकारण थांबावे लागणार नाही. परिणामी इंधनाची बचत होऊन वाहतूक कोंडीही कमी होणार आहे.

(नक्की वाचा-  Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)

सार्वजनिक निधीवर कोणताही भार नाही

या प्रकल्पाची अंमलबजावणी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) तत्त्वावर होत आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका किंवा शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली उपकरणे, त्यांची उभारणी, चाचणी, संचालन आणि देखभाल याची संपूर्ण जबाबदारी खासगी भागीदार कंपनीकडे असेल. त्यामुळे शहराला जागतिक दर्जाची स्मार्ट वाहतूक व्यवस्था मिळणार असून त्यासाठी मोठा भांडवली खर्च करावा लागणार नाही.

सिग्नल तोडणाऱ्यांवर AI ची नजर

वाहतूक शिस्त आणि रस्ते सुरक्षेला चालना देण्यासाठी ITMS अंतर्गत ऑटोमेटेड नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) आणि रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन (RLVD) प्रणाली कार्यरत केली जाणार आहे. या माध्यमातून सिग्नल तोडणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, लेन शिस्त मोडणे यांसारख्या नियमभंगाची नोंद आपोआप होणार आहे. उच्च दर्जाचे व्हिडीओ आणि छायाचित्र पुरावे संकलित करून ई-चलन प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केली जाणार आहे.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: पैशांपुढे नातं हरलं! मुलाने भररस्त्यात वडिलांना चाकूने वार करून संपवलं)

रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर'

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची वाहने वाहतूक कोंडीत अडकू नयेत यासाठी या प्रणालीमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्रीकृत नियंत्रण कक्षातून आवश्यकतेनुसार संबंधित मार्गावरील सिग्नल समन्वयित करून तात्काळ ग्रीन कॉरिडॉर तयार करता येणार आहे. त्यामुळे आपत्कालीन सेवांचा प्रतिसाद वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

Advertisement

नागरिकांशी थेट संवाद साधणारी प्रणाली

प्रकल्पातील 58 ठिकाणी व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले (VMD) बोर्ड आणि पब्लिक अॅड्रेस (PA) प्रणाली बसविण्यात येणार आहे. या माध्यमातून वाहतूक बदल, पर्यायी मार्ग, हवामानाचा इशारा, अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीबाबत नागरिकांना तात्काळ माहिती दिली जाऊ शकणार आहे. नियंत्रण कक्षातून काही सेकंदांत संपूर्ण शहरात संदेश प्रसारित करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये असेल.

टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

प्रकल्पाची अंमलबजावणी चार प्रमुख टप्प्यांत केली जाणार आहे. सुरुवातीला सर्व ठिकाणांचे सर्वेक्षण, त्यानंतर आवश्यक उपकरणांची उभारणी, प्रणालीची चाचणी व एकात्मिकरण आणि अखेरीस पूर्ण क्षमतेने कार्यान्वयन करण्यात येणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन अधिक वेगवान, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित होईल, असा विश्वास प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत राबवण्यात येणारी ही अत्याधुनिक ITMS प्रणाली देशातील इतर शहरांसाठीही आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article