राहुल कांबळे, नवी मुंबई
Navi Mumbai Fire News: नवी मुंबई वाशी येथील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये आज पहाटे भीषण आग लागून चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री साडेबाराच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण केले.
आग लागल्याची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी 6 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, या आगीत चार रहिवाशांचा मृत्यू झाला असून दहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
जखमींवर वाशीतील अपोलो एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या दुर्घटनेमुळे वाशी परिसरात आणि नवी मुंबईत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या सणाच्या काळात अशा दुर्घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.