राहुल कांबळे
नवी मुंबई पोलिसांनी शेअर्स मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली भारतातील नागरिकांची फसवणूक आणि अमेरिकेतील नागरिकांच्या संगणकांमध्ये रॅन्समवेअर मालवेअर हल्ला करून फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही संयुक्त कारवाई सायबर पोलीस ठाणे गुन्हे शाखा, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नवी मुंबई तुर्भे येथील मिलेनियम पार्कमध्ये बोगस कॉल सेंटर तयार करण्यात आले होते. 18 नोव्हेंबर 2025 रोजी मिलेनियम पार्क तुर्भे येथे छापेमारी करण्यात आली. येथे विविध नावांनी बोगस कंपन्या चालवून लोकांची फसवणूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
छाप्यात काही कंपन्या कार्यरत असल्याचे आढळले. त्यात The Wealth Growth, The Capital Services, Sigma, Trade Knowledge Services, Stock Vision या कंपन्यांचा समावेश होता. येथील 97 युवक-युवती संगणकावरून WhatsApp चॅट आणि कॉलद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत होते. या प्रकरणी तपासात 71 बँक खात्यांचा वापर केल्याचे आढळले आहे. यातील 61 खात्यांत एकूण 12.29 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे पोलिसांना आढळून आले. National Cyber Crime Reporting Portal (NCCRP) वर तपासताना देशभरातून या खात्यांवर 31 फसवणूक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
छाप्यात उघड झाले की हे कॉल सेंटर रात्री 6.30 वाजल्यापासून पहाटे 3.30 वाजेपर्यंत अमेरिकेत फसवणूक करत होते. IT Mac World Solution च्या नावाने अमेरिकन नागरिकांच्या संगणकांमध्ये Ransomware/Malware Attack केला जात होता. त्यामुळे त्यांच्या स्क्रीनवर Microsoft Error Code दिसत असे. त्यासोबत खोटा Microsoft Customer Support Number (त्यांचा स्वतःचा VOIP नंबर) दाखवला जात होता. अमेरिकन नागरिकांनी त्या नंबरवर कॉल केल्यानंतर कॉल सेंटर कर्मचारी स्वतःला Microsoft Support Agent म्हणून ओळख देत होते. मग ते त्यांच्या संगणकातील सेटिंग बदलण्यास सांगत. समस्या मिटवल्याचा भास निर्माण करून, मोबदल्यात मोठी रक्कम वसूल करत होते. विशेष म्हणजे इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्राहकांशी बोलण्यासाठी स्क्रिप्टही दिलेली होती.
या कारावाईत पोलीसांनी मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले आहे. त्यात 38 मोबाईल फोन,108 संगणकांपैकी 21 CPU (पुराव्यासाठी),5 लॅपटॉप,1 GSM सर्व्हर याचा समावेश आहे. शिवाय 20 आरोपी अटक ही करण्यात आली आहे. या सर्वांना 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये अनेक बँक खाती, तांत्रिक सुविधा आणि बाहेरील लोकांचा सहभाग असल्याचे संकेत मिळाले आहेत. फसवणुकीची रक्कम आणखी वाढू शकते, असेही पोलिसांनी सांगितले. तपास डीसीपी क्राईम सचिन गुंजाळ आणि त्यांची टीम करत आहे