CIDCO News: नवी मुंबईत खळबळ! सिडकोच्या महत्त्वाच्या फाइल गायब, लाखो नागरिकांच्या मालमत्तेवर टांगती तलवार?

CIDCO News: नवी मुंबई सिडको विभागातील मालमत्ता कागदपत्रे गहाळ होण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या मालकी हक्कावर संकट निर्माण झाल्याची माहिती समोर आलीय. सजग नागरिक मंचाने डिजिटलायझेशनची मागणी करत मुख्यमंत्र्‍यांकडे केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"CIDCO News: सिडकोच्या महत्त्वाच्या फाइल गहाळ?"

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या शहराच्या नियोजन आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडकोच्या वसाहत (City and Industrial Development Corporation) विभागातील भूखंड आणि सदनिकांशी संबंधित महत्त्वाच्या फाइल्स गहाळ होण्याच्या घटनांमुळे प्रशासनातील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सजग नागरिक मंचाने सर्व मालमत्ता नोंदींचे तातडीने डिजिटलायझेशन करण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवले आहे.

सजग नागरिक मंचाच्या निवेदनानुसार, सिडकोमधील बहुतांश नोंदी अजूनही कागदी स्वरूपात रेकॉर्ड रूममध्ये साठवण्यात येतात. पण या कागदपत्रांना आग, पूर, चोरी किंवा छेडछाड यांचा कायम धोका असल्याने लाखो नागरिकांच्या मालकी हक्कावर संकट येण्याची शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडल्यास मूळ कागदपत्रे नष्ट होऊन हजारो भूखंड आणि सदनिकांबाबत गंभीर कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. अलीकडेच सिडको मुख्यालयातून एका महत्त्वाच्या भूखंडाची फाइल गहाळ झाल्याची घटना समोर आली होती. राज्य माहिती आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतरच या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे मंचाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

संपूर्ण व्यवस्था धोक्यात 

सजग नागरिक मंचाच्या मते सिडकोच्या रेकॉर्ड व्यवस्थेत अनेक गंभीर त्रुटी आहेत. अग्निरोधक रेकॉर्ड रूमचा अभाव, डिजिटल बॅकअप नसणे, फाइल ट्रॅकिंग प्रणाली नसणे, एजंटला सहज प्रवेश, अपुरी सीसीटीव्ही देखरेख तसेच मूळ कागदपत्र हाताळण्यासाठी ठोस नियम नसणे या कारणांमुळे संपूर्ण व्यवस्था धोक्यात आली आहे. दरम्यान गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या सिडकोकडे नोंदींच्या सुरक्षिततेसाठी निधी नसल्याचे कारण ग्राह्य धरता येणार नाही, असा सवालही मंचाने उपस्थित केला आहे. नागरिकांच्या मालमत्ता हक्काशी संबंधित हा अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचे मंचाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

(नक्की वाचा: Navi Mumbai : नवी मुंबईत सिडकोच्या माजी अधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई, राहत्या घरी ACB चं पथक पोहोचलं अन्..)

ठोस उपाययोजनांची मागणी

‘सजग नागरिक मंचा'तर्फे पुढील उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी करण्यात आली आहे:

  • सहा महिन्यांच्या आत सर्व नोंदींचे डिजिटलायझेशन
  • प्रत्येक फाइलला युनिक आयडी देणे
  • क्लाउड आणि ऑफलाइन बॅकअप प्रणाली उभारणे
  • बायोमेट्रिक प्रवेश नियंत्रण लागू करणे
  • अग्निरोधक रेकॉर्ड रूम तयार करणे
  • वार्षिक सुरक्षा ऑडिट अनिवार्य करणे

तसेच गहाळ फाइल प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंचाचे सदस्य भीमराव जमखंडीकर यांनी केली आहे.

या प्रकरणामुळे सिडकोच्या कारभारातील पारदर्शकता आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.