राहुल कांबळे, नवी मुंबई
हुक्का पार्लरवर बंदी असताना देखील एका कॅफेमध्ये ते सुरु असल्याचा प्रकार कोपरखैरणे सेक्टर 1 मधील मित्तल टॉवरमधील उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या तीन व्यावसायिक गाळ्यांवर सील ठोकले आहे. ‘ताज कॅफे' मध्ये हा प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून हुक्कासंबंधी साहित्य जप्त केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जप्त मुद्देमालामध्ये 5,249 रुपये किमतीचे हुक्का ओढण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रबरी पाईप (3), काचेचे हुक्का पॉट डला (2), फलेवरचे डबे (2) व फलेवरचे 50 ग्रॅम वजनाचे पाकीट यांचा समावेश आहे. तर सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे तीन व्यवसायिक गाळे बीएनएसएस कलम 164 अंतर्गत सीलबंद करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- 'वासनाकांड'प्रकरणावरून IPS जालिंदर सुपेकरांविरोधात निघाला होता मोर्चा, 25 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?)
पोलिसांनी याप्रकरणी हेमंत पंडीत, नदा अब्दुल मझिद झुमानी या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही बंदी असलेली हुक्का सेवा पुरवत होते. दोघांवर कलम 223, 271, 272, 3(5), सह कलम 4 व 21 (अ) कोटपा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत समाजविघातक कृत्य रोखले.
(नक्की वाचा- Explainer: चिनाब रेल्वे पूलाचं स्वप्न अखेर पूर्ण! चीन-पाकिस्तानचं का वाढलं टेन्शन? वाचा संपूर्ण माहिती)
संबंधित कलमांनुसार सार्वजनिक ठिकाणी हुक्का सेवा देणे बेकायदेशीर असूनही हे आरोपी विविध फ्लेवर वापरून धूम्रपानासाठी वातावरण तयार करत होते. या प्रकारामुळे तरुणाई हुक्का सेवनाच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई कोपरखैरणे पोलीस करत असून, हुक्का पार्लरशी संबंधित इतर कोणते नेटवर्क कार्यरत आहे का? याचा शोध घेतला जात आहे.