विनय म्हात्रे, नवी मुंबई
नवी मुंबईत भाजपला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. भाजपने उमेदवारी न दिल्याने संदीप नाईक यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. संदीप नाईक यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. संदीप नाईक यांच्यासोबत 25 माजी नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) संदीप नाईक यांच्यात सामना होणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर संदीप नाईक यांनी म्हटलं की, 2019 ला अशी काही परिस्थित निर्माण झाली, त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला होता. नवी मुंबईच्या विकासासाठी निर्णय घ्यावा लागला होता. मी दोन टर्म आमदार असताना देखील आम्हाला विकासासाठी थांबवं लागलं. यावेळी संदीप नाईक यांना मंदा म्हात्रे यांच्यावर देखील टीका केली.
(नक्की वाचा- उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?)
नवी मुंबई महापालिकेत पाण्याचा प्रश्न आर आर पाटील यांच्या पुढाकाराने आमच्या नेतृत्वाने (गणेश नाईक) सोडवला. शरद पवार यांनी कशा प्रकारे विकास केला ते संदीप नाईक यांनी मांडले. 2021 पासून आपल्या लोकांना पाण्याचा समस्येला सामोरं जावं लागलं. आपले पाणी दुसरीकडे वळवण्यात आले. जेव्हा जेव्हा अन्याय झाला त्यावेळी मी आवाज उठवला. पण काही जणांनी भूमिका घेतली नाही, असा टोला संदीप नाईक यांनी मंदा म्हात्रे यांना लगावला.
आम्हाला जो सन्मान मिळाला पाहिजे होता तो सन्मान आम्हाला मिळाला नाही. 2024 ला सन्मान मिळेल आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असे वाटले होते. मात्र दुर्देवाने एकतर्फी निर्णय घेतला गेला. आमच्या कार्यकर्त्यांना अपमान करणारी वागणूक आमदारांनी दिली, अशी टीकाही संदीप नाईक यांनी म्हंदा म्हात्रे यांच्यावर नाव न घेता केली.
(नक्की वाचा- पहिल्या यादीत नाव का नाही? भाजपचे विद्यमान आमदार थेट बोलून गेले)
अपमान आम्ही सहन केला, पण नवी मुंबईचा होणारा ऱ्हास आम्ही सहन करणार नाही. नवी मुंबईतील नागरिकांसाठी हा निर्णय मी घेतला आहे. माझी लढाई ही नवी मुंबईच्या हिताकरिता आहे. आम्ही सर्वांचा सन्मान केला आहे. येणारी लढाई स्वाभिमानीसाठी आहे, असं म्हणत संदीप नाईक यांनी मंदा म्हात्रे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.