नवी मुंबईतील कामोठे येथे एका शाळेत एका सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षकांकडूनच त्रास दिला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन शिक्षकांविरुद्ध बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमकी घटना?
कामोठे येथील एका नामांकित खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या मुलाचा दोन वेगवेगळ्या दिवशी छळ करण्यात आला. पहिल्या घटनेत 14 नोव्हेंबर रोजी एका शिक्षकाने दुसरीतील एका विद्यार्थिनीला बोलावले आणि या 6 वर्षांच्या मुलाच्या गालावर 5 ते 6 चापट मारण्यास सांगितले. मुलाला मारहाण होत असताना संबंधित शिक्षक केवळ बघत राहिला नाही, तर तो या कृत्यावर हसत होता, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)
दुसऱ्या घटने 28 नोव्हेंबर रोदी इंग्रजीच्या तासादरम्यान दुसऱ्या एका शिक्षकाने याच मुलाला कंपास बॉक्सने बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे चिमुकल्याच्या ओठाला मोठी सूज आली होती.
पोलिसांची कारवाई
मुलाने घरी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी तत्काळ कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी बुधवारी दोन्ही शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. "आम्ही शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीची आणि तिथल्या वातावरणाची सखोल चौकशी करत आहोत," अशी माहिती कामोठे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या घटनेमुळे शाळेत आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. चिमुकल्यांना अशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.