राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 16 उमेदवारांना आज एबी फॉर्म दिले आहेत. म्हणजेच अजित पवार गटाने आपले 16 उमेदवार एकप्रकारे घोषित केले आहेत. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी अजित पवारांना ही रणनीती आखल्याची माहिती आहेत.
अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आज सकाळपासून नेत्यांची रीघ लागली होती. देवगिरी बंगल्यावर आतापर्यंत आलेले 16 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या 16 नेत्यांमध्ये छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे यांचा समावेश आहे.
(नक्की वाचा- BJP First List : भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये काय? 99 उमेदवार कोण? वाचा सविस्तर)
दिंडोरीत पिता-पुत्र आमन-सामने?
नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघात महायुतीचा तिढा सुटल्याचं दिसून येत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडूनही दिंडोरी मतदारसंघावर दावा केला जात होता. माजी आमदार धनराज महाले यांनी काल देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ मात्र शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. त्यामुळे दिंडोरीत आता पिता पुत्र लढत होणार? की शरद पवार दुसरा कोणी उमेदवार देणार ? याकडे लक्ष लागले आहे.
लातूरच्या उदगीरमधून भाजपकडून विश्वजीत गायकवाड हे इच्छुक होती. मोठं शक्तीप्रदर्शन करत त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. मात्र अजित पवार गटाने संजय बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केल्याने ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विश्वजीत गायकवाड आता माघार घेणार की अपक्ष रिंगणात उतरणार हे पाहावं लागेल.
(नक्की वाचा- Santosh Bangar News : शिवसेना आमदार संतोष बांगरांविरोधात गुन्हा दाखल; 'ते' वक्तव्य भोवलं)
कुणाला एबी फॉर्म मिळाले?
- राजेश विटेकर - परभणी
- संजय बनसोडे - उदगीर, लातूर
- चेतन तुपे - हडपसर, पुणे
- सुनील टिंगरे- वडगाव शेरी, पुणे
- दिलीप वळसे पाटील - आंबेगाव, पुणे
- दौलत दरोडा - शहापूर, ठाणे
- राजेश पाटील -
- दत्तात्रय भरणे - इंदापूर, पुणे
- आशुतोष काळे- कोपरगाव, अहमदनगर
- नरहरी झिरवळ- दिंडोरी, नाशिक
- छगन भुजबळ- येवला, नाशिक
- भरत गावित -
- बाबासाहेब पाटील-
- अतुल बेनके- जुन्नर, पुणे
- हिरामण खोसकर- इगतपुरी, नाशिक
- यशवंत माने- मोहोळ
- इंद्रनील नाईक - पुसद