अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune NCP Resignation News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेले नाराजी नाट्य आता अधिक गडद झाले आहे. पक्षात सन्मान मिळत नाही आणि योग्य सहकार्यही लाभत नाही, असा थेट आरोप करत आणखी एका प्रदेशाध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे राजीनामे दिले जात असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कार्यशैलीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत पदाधिकारी बाहेर पडत असल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
काय आहे प्रकरण?
महानगरपालिका कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गौतम खरात यांनी त्यांच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खरात यांनी अत्यंत परखड शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी आजवर अत्यंत निष्ठेने पक्षाचे काम केले, मात्र प्रदेश पातळीवरून अपेक्षित मार्गदर्शन किंवा सहकार्य मिळाले नाही, असे त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
तसेच, पक्षात केवळ ठराविक लोकांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचाच सन्मान केला जात असून त्यांनाच पदे दिली जात असल्याचा गंभीर आरोपही खरात यांनी केला आहे. सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अवमान होत असल्याने आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
( नक्की वाचा : Pune News: मोबाईल लोकेशन अन् लाल कपडे...आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा पुणे पोलिसांनी वाचवला असा जीव! )
अजित पवारांच्या काळातील राजीनामा नाट्य
या संपूर्ण प्रकरणाची मुळे 26 जानेवारी रोजी घडलेल्या घडामोडींमध्ये आहेत. सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन काही सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले होते. त्यावेळी अजित पवार यांनी हे राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला होता आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलावले होते.
मात्र, त्यानंतर अजित पवार यांच्या निधनामुळे आणि त्यापूर्वी झालेल्या अपघातामुळे पक्षातील सर्व गणिते बदलली. अजित पवार जोपर्यंत सक्रिय होते, तोपर्यंत त्यांनी हे राजीनामे फेटाळले होते, परंतु त्यांच्या पश्चात अवघ्या दीड महिन्यातच या पदाधिकाऱ्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Pune News: मंचरमध्ये पुन्हा धार्मिक वादाची ठिणगी! मशिदीखाली भुयार सापडल्याच्या चर्चेनंतर आता बारवेवर रणकंदन )
एकापाठोपाठ एक राजीनाम्यांची मालिका
राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे राजीनामा सत्र केवळ एका पदाधिकाऱ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. गौतम खरात यांच्या आधी राष्ट्रवादी मोटर मालक वाहतूक सेलचे सचिन जाधव, उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालवणी आणि असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांनीही आपले राजीनामे दिले आहेत.
या सर्व नेत्यांनी सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आक्षेप नोंदवला होता. पक्षात जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्या समीकरणांना महत्त्व दिले जात असल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
पक्षांतर्गत संघर्षाचा पुढील प्रवास
एकीकडे पक्ष संघटना मजबूत करण्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे एकामागून एक सेलचे प्रदेशाध्यक्ष राजीनामे देत असल्याने सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. पदाधिकाऱ्यांनी लावलेला घराणेशाहीचा आणि पक्षपाताचा आरोप आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतो. आता या राजीनामा सत्रानंतर पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व यावर काय भूमिका घेते आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world