जाहिरात

Pune News: पुणेकरांचं आरोग्य धोक्यात! "भयंकर महामारी वाट पाहतेय", उद्योगपतीची पोस्ट चर्चेत

Pune News: पुण्यातील एक उद्योजक विनीत के. यांनी सोशल मीडियावर चिखलमिश्रित, तपकिरी रंगाच्या पाण्याचा फोटो शेअर करत टँकर लॉबीच्या मनमानी कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

Pune News: पुणेकरांचं आरोग्य धोक्यात! "भयंकर महामारी वाट पाहतेय", उद्योगपतीची पोस्ट चर्चेत

पुणे शहरात पाणी टंचाईमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना, आता पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेने पुणेकरांची झोप उडवली आहे. पुण्यातील एका उद्योजकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये येणाऱ्या टँकरच्या पाण्याच्या दर्जावर प्रकाश टाकला आहे.

पुण्यातील उद्योजक विनीत के. यांनी त्यांच्या निवासी सोसायटीमध्ये आलेल्या टँकरच्या पाण्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये पाणी अत्यंत गढूळ आणि तपकिरी रंगाचे दिसत आहे. या फोटोवर उपरोधिक टोला लगावत त्यांनी लिहिले, "कोणतेही प्रिजर्व्हेटिव्ह्ज न घालता, टँकरद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा हाच तो खरा रंग आहे."

सोसायटीचा वर्षाला 70 लाख रुपये खर्च, पाणी मात्र दूषित

विनीत यांच्या दाव्यानुसार, त्यांच्या सोसायटीमध्ये पाण्याची टंचाई भागवण्यासाठी दरवर्षी तब्बल 70 लाख रुपये केवळ पाण्याच्या टँकरवर खर्च केले जातात. इतका प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसूनही रहिवाशांना जे पाणी मिळत आहे, ते रोजच्या वापरासाठी किंवा पिण्यासाठी अत्यंत अयोग्य आणि घातक आहे.

या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना विनीत यांनी म्हटलं, "जर आमच्यासारख्या मोठ्या सोसायट्यांची ही अवस्था असेल, तर शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना कसले पाणी मिळत असेल, याचा विचारच न केलेला बरा. टँकर चालकांकडून पाण्याच्या गुणवत्तेची कोणतीही तपासणी केली जात नाही का?"

(नक्की वाचा-  Monsoon Update: राज्यात पाऊस कधी येणार? 'या' तारखेपासून मान्सून पुन्हा सक्रीय होण्याचा IMD चा अंदाज)

"पुण्यात आरोग्याचे मोठे संकट घोंघावतेय"

या दूषित पाण्यामुळे पुणे शहरात लवकरच एक मोठी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अशा गढूळ पाण्याचा वापर घरकामासाठी किंवा पिण्यासाठी केल्यास त्वचेचे विकार आणि पोटाचे गंभीर आजार, दूषित पाण्यापासून होणारे रोग पसरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

"पुण्यात एक आरोग्य महामारी आपली वाट पाहत आहे," असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला की, ज्या नागरिकांनी पुण्यात 1 कोटी ते 1.50 कोटी रुपये खर्च करून हक्काचे घर घेतले आहे, त्यांना अशा अत्यंत वाईट आणि आरोग्याला घातक असणाऱ्या परिस्थितीमध्ये जगण्यास भाग पाडले जात आहे.

(नक्की वाचा-  Shiv Sena UBT Crisis: उद्धव-आदित्य ठाकरे गप्प, संजय राऊतांची बॅटिंग; ठाकरे गटात नेमकं काय सुरुये?)

कडक कारवाईची मागणी

विनीत के. यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, पुणेकरांनी यावर आपल्या तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पुण्यात पालिकेच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक भागांना पूर्णपणे खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागते. या पार्श्वभूमीवर, टँकरच्या पाण्याच्या स्रोतांची नियमित तपासणी व्हावी, पालिकेने आणि संबंधित प्रशासनाने टँकर चालकांवर कडक देखरेख ठेवावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com