Rohit Pawar Post: अजितदादांबाबत हे धाडस करू नका!; रोहित पवारांची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Rohit Pawar Post on Ajit Pawar Death: बारामतीतील बदललेले वातावरण आणि अजितदादांच्या नावापुढील 'स्वर्गीय' शब्दाबाबत रोहित पवार यांनी व्यक्त केलेली भावना अनेकांचे डोळे पाणावणारी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Rohit Pawar Post on Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. बारामतीतील बदललेले वातावरण आणि अजितदादांच्या नावापुढील 'स्वर्गीय' शब्दाबाबत त्यांनी व्यक्त केलेली भावना अनेकांचे डोळे पाणावणारी आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि मा. अजितदादा…! आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायच. त्यावर उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा भावी_मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात मा. अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा.. ते पाहून मन आनंदाने भरुन यायचं आणि अभिमानही वाटायचा… पण आज?"

रोहित पवारांची पोस्ट

"डोंगराएवढ्या दुःखापुढं आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे... ना आनंदाचा जल्लोष…! गळ्यात हार घातलेला मा. अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाही."

"आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि मा. अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, मा. अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळ मा. अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस माझ्यात नाही तसं आपणही करू नये", असं रोहीत पवारांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. 

Topics mentioned in this article