ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
NCP Merger News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलीनीकरण होणार का? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत आहे. विशेषत: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या पक्षाकडून याबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. या विषयावर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज (शनिवार, 14 फेब्रुवारी) मोठी घोषणा केली आहे.
आमच्या पक्षाकडून यापुढे विलीनीकरणावर कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना नवी दिशा मिळालीय. विलीनीकरणाच्या मुद्यावर शरद पवारांच्या पक्षानं माघार घेतली का? असा प्रश्न यामुळे विचारला जात आहे.
विलीनीकरणाचा विषय आता बंद
शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या विषयावर आपली भूमिका मांडताना सांगितले की, अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रिकरणाबाबतचा निर्णय झाला होता. त्यांच्या पक्षातील अनेक लोक याबद्दल वारंवार बोलत आहेत, परंतु आता आम्ही हा विषय पूर्णपणे बंद केला आहे. आम्हीच विलीनीकरणासाठी मागे लागलो आहोत, असे चित्र सध्या निर्माण केले जात आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. आमच्याकडून यासाठी कोणतीही घाई किंवा गडबड करण्यात आलेली नाही.
दादांच्या निधनानंतर या विषयाची चर्चा सुरू झाली आणि आम्ही फक्त सत्य मांडले आहे. जे बोललो ते शपथपूर्वक बोललो आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Ajit Pawar :अजित पवारांना कुणाच्या धमक्या होत्या? शशिकांत शिंदेंच्या खळबळजनक गौप्यस्फोटावर तटकरेंचं उत्तर )
'त्या' शब्दावर स्पष्टीकरण
अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल बोलताना शशिकांत शिंदे यांनी आधी वापरलेला चूक हा शब्द मागे घेतला आहे. त्यांना काही गोष्टींमध्ये सुधारणा करायची होती किंवा दुरुस्त्या करायच्या असतील, असे शिंदे यांनी म्हटले. आम्ही केवळ आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या, त्याबद्दल कोणताही आक्षेप नाही.
निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विलीनीकरणाचे सूत्र काय असावे, हे बैठकीत ठरणार होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आता विलीनीकरणाबाबतच्या जर-तरच्या गोष्टींवर आम्ही विचार करणार नाही. त्यांनी भविष्यात कोणताही प्रस्ताव दिला, तर तो स्वीकारायचा की नाही, हे आमचा पक्ष नंतर ठरवेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
( नक्की वाचा : Rahul Narvekar: संतप्त शेतकऱ्यांसमोर राहुल नार्वेकरांनी पळ काढला; Video Viral! वाचा काय आहे प्रकरण? )
सुनील तटकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेलाही शिंदे यांनी उत्तर दिले आहे. सुनील तटकरे हे पक्षाचे जुने नेते होते, त्यामुळे लेख लिहिण्याची प्रक्रिया काय असते, याची त्यांना पूर्ण कल्पना असायला हवी. त्यांनी आपली भूमिका मांडावी, आम्ही आमची राष्ट्रवादी पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने उभी करण्यासाठी काम करत आहोत. आमचे कार्यकर्ते पक्षाशी पूर्ण निष्ठेने जोडलेले आहेत. ज्याचे हृदय जिथे असते, तो माणूस तिथेच राहतो, त्यामुळे पक्ष बांधणीत आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवारांच्या मागणीला पाठिंबा
आमदार रोहित पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर बोलताना शिंदे म्हणाले की, रोहित पवार यांनी जे विषय मांडले आहेत, त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. त्याचा अहवाल समोर येणे गरजेचे आहे. रोहित पवार यांनी दिलेली तांत्रिक माहिती आणि मुद्दे खरे आहेत, असे समर्थनही त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, राज्यसभेबाबत संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर अद्याप आमच्या पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही, योग्य वेळी त्याबद्दल माहिती दिली जाईल, असे सांगून त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world