Supriya Sule on NCP Merger: अजित पवार गटाचे 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडलेल्या बैठकीत यावर सविस्तर मंथन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या या महत्त्वाच्या बैठकीत केवळ राजकीय रणनीतीच नाही, तर पक्षाच्या अस्तित्वाबाबत सुरू असलेल्या अफवांवरही नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. विशेषतः पक्षाच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना या बैठकीत पूर्णविराम देण्यात आला आहे.
आमदारांची अस्वस्थता आणि नेतृत्वाचे मौन
बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांनी विलीनीकरणाच्या बातम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत असल्याचा मुद्दा थेट नेतृत्वाकडे मांडला. पक्षाचे पॉवर सेंटर असलेल्या शरद पवार यांनी या विषयावर मौन बाळगले असले तरी, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या विषयावर भूमिका स्पष्ट केली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सध्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. पक्षाला स्वतःच्या बळावर अधिक मजबूत करणे आणि वाढवणे हेच आमचे सध्याचे एकमेव उद्दिष्ट असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
( नक्की वाचा : Kalyan News: बैठक सुरू झाली अन् अचानक 60 - 70 जण घुसले; कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शाखेत जोरदार राडा )
अजित पवार गटात मोठी गळती लागणार?
दुसरीकडे, अजित पवार गटातील अस्वस्थतेचा मुद्दा या बैठकीत केंद्रस्थानी राहिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी गटातील सुमारे 22 आमदार गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात असून ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत.
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली गुप्त भेट आणि त्यानंतर निर्माण झालेली स्थिती यामुळे अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी या आमदारांबाबत बैठकीत कोणतीही थेट चर्चा केली नसली तरी, त्यांची ही शांतता एका मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.
( नक्की वाचा : वांद्र्यात अवैध वस्ती वाचवण्यासाठी पोलिसांवर थेट हल्ला, जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आक्रमक, नेमकं काय घडतंय? )
नीट पेपर लीक आणि जनसामान्यांचे प्रश्न
राजकीय गणितांसोबतच पक्षाने आता जनसामान्यांच्या प्रश्नांवरही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि विशेषतः देशभरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट (NEET) परीक्षेतील पेपर लीक प्रकरणावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यासाठी पक्ष लवकरच आक्रमक पवित्रा घेणार असून तरुणांशी संवाद वाढवण्यासाठी विशेष मोहीम आखली जाणार आहे. थोडक्यात, शरद पवार यांनी एका बाजूला आपला गट एकसंध ठेवतानाच दुसरीकडे अजित पवार यांच्या गोटात मोठा सुरुंग लावण्याचे संकेत दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world