रामराजे शिंदे, नवी दिल्ली
Sunetra Pawar In Delhi: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या भवितव्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत निर्णायक मानला जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का?' या चर्चेला उधाण आले असून, राजधानीत आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर असून, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर आणि अजित पवार यांच्या निधनानंतरचा त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवारांच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत ठाण मांडून असल्याने 'विलीनीकरणा'च्या चर्चेने जोर धरला आहे.
सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यातील 4 प्रमुख मुद्दे
दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण
सर्वात मोठी चर्चा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची आहे. जर हे विलीनीकरण झाले, तर राज्यसभेच्या गणितात मोठा बदल होईल आणि महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणे कठीण होईल.
(नक्की वाचा- Pune News: पुणेकरांना रस्त्याने ये-जा करत 50 हजार रुपये कमाईची संधी! काय करावं लागेल?)
राज्यसभेची रिक्त जागा
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. सुनेत्रा पवार आज उपराष्ट्रपतींकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे. या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षपद
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व कोणाकडे असेल, याबाबत पेच आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत या दौऱ्यात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम नाव निश्चित केले जाऊ शकते.
(नक्की वाचा- UP News: रात्री झोपी गेलेली तरुणी बनली 'नागीण'! सकाळी बेडरुमधील दृश्य पाहून अख्ख गाव हादरलं)
जिल्हा परिषद निवडणुकीतील यश
राज्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने, विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादीने मिळवलेल्या यशाचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.
देवेंद्र फडणवीस यांची भूमिका निर्णायक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनेत्रा पवारांच्या आधीच दिल्लीत पोहोचले असून, त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी प्राथमिक चर्चा पूर्ण केली आहे. या दौऱ्यात राष्ट्रवादीचे इतर खासदार आणि वरिष्ठ नेतेही सुनेत्रा पवारांसोबत उपस्थित राहणार आहेत. जर राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होईल. यामुळे विरोधी पक्षांची ताकद कमी होऊन सत्ताधारी महायुती अधिक प्रबळ होईल.