पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्यातून एक अत्यंत 'गेमचेंजर' आश्वासन समोर आले आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पुणेकरांचे पैसे वाचवण्यासाठी 'मोफत बस आणि मेट्रो प्रवास' देण्याची मोठी घोषणा केली आहे.
पुणे शहराची ओळख आता 'वाहतूक कोंडीचे शहर' अशी होऊ लागली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या संयुक्त जाहीरनाम्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना मोफत सार्वजनिक वाहतूक देण्याचे वचन दिले आहे. अजित पवार यांनी या योजनेचे संपूर्ण गणित मांडत हे कसे शक्य आहे, हे पुणेकरांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
ही योजना का गरजेची?
अजित पवार यांनी पुणेकरांच्या खिशाला बसणारी गळती आकडेवारीसह स्पष्ट केली.
पुण्यात आज 30 लाख वाहने आहेत. त्यातील दररोज 15 लाख वाहने वाहतूक कोंडीत 1 तास अडकतात. यातून अर्धा लिटर इंधन आणि वेळेची किंमत 150 रुपये धरले तरी रोजी 30 लाख रुपयांचे नुकसान होते. महिन्याला हा आकडा 900 कोटी रुपये आणि वर्षाला 10 हजार 800 कोटी रुपये वाहतूक कोंडीमुळे वाया जातात.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
योजनेचा खर्च आणि फायदे
अजित पवारांच्या मते, हा खर्च पुणेकरांच्या होणाऱ्या नुकसानापेक्षा खूपच कमी आहे. मोफत बस आणि मेट्रो करण्यासाठी दोन्ही महापालिकांना मिळून महिन्याला केवळ 300 कोटी रुपये द्यावे लागतील.
मेट्रोसाठी दरमहा 5 कोटी आणि पीएमपीएमएलसाठी 20 कोटी रुपये दिल्यास सर्व नागरिकांना मोफत प्रवास उपलब्ध करून देता येईल. मोफत बस आणि मेट्रो प्रवासामुळे रस्त्यावरील खाजगी वाहने कमी होतील, परिणामी प्रदूषण कमी होऊन पुणे 'ग्रीन सिटी' होण्यास मदत होईल. वाहतूक कोंडी कमी झाल्याने पुणेकरांचा अमूल्य वेळ वाचेल.
"माझ्यावर विश्वास टाका, मी करून दाखवेन"
अजित पवार यांनी पुणेकरांना आवाहन करताना म्हटले की, "पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा 2025-26 चा अर्थसंकल्प पाहता या दोन्ही शहरांसाठी 300 कोटी खर्च करणे कठीण नाही. मी हे गणित प्रशासनाला समजावून सांगितले आहे. पुणेकरांनी माझ्यावर विश्वास टाकावा, मी हे नक्की करून दाखवेन."