NDTV BMC Power Play: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये निवडणुका पार पडत आहेत. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक केंद्रस्थानी आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या 'मुंबईच्या महासंग्रामा'वर प्रकाश टाकण्यासाठी NDTV नेटवर्कतर्फे 11 जानेवारी रोजी 'NDTV BMC Power Play' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
काय आहे 'बीएमसी पॉवर प्ले'? (What is BMC Power Play?)
NDTV 'बीएमसी पॉवर प्ले' कार्यक्रमात केवळ राजकीय चर्चा नाही तर मुंबईच्या अस्तित्वाशी निगडित मुद्द्यांवर देखील प्रकाश टाकला जाणार आहे. मुंबईसमोरील पायाभूत सुविधांची आव्हाने, मुंबईकरांना त्यांच्या शहरासाठी काय हवं आहे आणि कोणत्या नेत्याचा व्हिजन काय आहे, हे समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे चेहरे सहभागी होणार आहेत. यामध्ये सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंगलप्रभात लोढा, श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, नवाब मलिक इत्यादी नेते उपस्थित असणार आहेत. तर विरोधकांकडून संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल परब, सुषमा अंधारे असे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अमित ठाकरे, प्रफुल्ल पटेल, विनोद तावडे, शाइना एनसी, शीतल म्हात्रे इत्यादी नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत.
"मुंबईच्या महानगरपालिका निवडणुका केवळ शहरावर कोण राज्य करणार याबद्दल नाहीत, तर एका जागतिक महानगराची वाढ, पायाभूत सुविधा आणि उत्तरदायित्वाच्या दबावांना कसा प्रतिसाद देते, याबद्दल आहेत. बीएमसी पॉवर प्ले हे या समस्यांना लोकांसमोर ठळकपणे मांडण्यासाठी आणि मुंबई शहर कोणत्या प्रकारचे शहर बनत आहे, याचे परीक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे", असं एनडीटीव्ही मराठीचे कार्यकारी संपादक जितेंद्र दीक्षित यांनी म्हटलं.