Ritu Tawade News : मुंबईकरांच्या हक्काच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी आम्ही १०० दिवसांचा विशेष कृती आराखडा (Plan) तयार केला. या अंतर्गत महापालिकेतील तब्बल १००० कोटींची अनावश्यक टेंडर्स रद्द करून आम्ही करदात्यांचा पैसा वाचवला आहे. गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात मुंबईकरांचा वाया गेलेला पैसा वाचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे, असा थेट आणि मोठा दावा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केला आहे. आपल्या कामाचा लेखाजोखा मांडताना त्यांनी मुंबईच्या विकासाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. 'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कॉन्क्लेव्हची थीम 'नारी शक्ती महाराष्ट्राची' अशी आहे. यावेळी महापौर रितू तावडे बोलत होत्या.
केबिनमध्ये बसून नाही, तर जनतेत जाऊन काम करणार!
महापौरपदाच्या जबाबदारीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मुंबईचं महापौरपद हे अत्यंत जबाबदारीचं पद आहे. मी गेली २२ वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. तळगाळातील या कामाचा अनुभव आज माझ्या पाठीशी आहे. महापौर झाल्यावर केवळ केबिनमध्ये बसून काम होणार नाही. जोपर्यंत आपण थेट लोकांशी चर्चा करत नाही, तोपर्यंत या पदाला खऱ्या अर्थाने न्याय देता येऊ शकत नाही.
काँग्रेस ते भाजप: शिस्त आणि शिकवण
आपल्या राजकीय प्रवासावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले, २००७ पूर्वी मी सामाजिक क्षेत्रात आणि काँग्रेस पक्षासोबत काम करत होते. त्यानंतर २०१२ मध्ये मला भाजपने उमेदवारी दिली. भाजप हा अतिशय शिस्तप्रिय पक्ष असून इथे तुमच्याकडून काम करून घेतले जाते. गेल्या १५ वर्षांतील पक्षाची हीच शिकवण आज माझ्या कामात दिसते आहे.
'मुंबई क्लिनिंग ३६५' आणि पर्यावरण संकल्पना
मुंबईला स्वच्छ आणि हरित बनवण्यासाठी महापौर विशेष योजना राबववित आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग जवळपास १००० झाडे लावली जाणार आहेत. अनेकदा झाडे लावली जातात, पण त्यांची निगा राखली जात नाही म्हणूनच, एक झाड आईच्या नावाने ही संकल्पना प्रत्येकाने राबवायला हवी. प्रत्येक कुटुंबाने २ ते ३ झाडे लावून त्यांचे जतन करावे, ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे, असं आवाहन त्यांनी केले. महापालिकेचा महसूल वाढवण्यासोबतच यात लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईची तुंबई होणार नाही; नालेसफाई पूर्ण आणि खड्डेमुक्तीचा निर्धार
मुंबईकरांना पावसाळ्यात भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या समस्येवर महापौरांनी स्पष्ट आश्वासन दिले. त्या म्हणाल्या, ८०% नालेसफाई पूर्ण झाली आहे. याशिवाय अतिरिक्त पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. आजही मुंबईकरांच्या मनात २६ जुलैच्या महापुराची भीती आहे. मात्र, आता ती परिस्थिती उद्भवणार नाही, कारण सखल भागांमध्ये अतिरिक्त हाय-कॅपॅसिटी पंप बसवण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world