- स्कूल बसचे भाडे किती असावे याचा निर्णय या पुढे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून घेणार
- वार्षिक भाडे आगाऊ घेण्यास मनाई करण्यात आली असून पालकांना मासिक भाडे भरण्याची सुविधा दिली जाईल
- पूर्व-प्राथमिक ते पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बसमध्ये महिला अटेंडंट असणे अनिवार्य करण्यात आले आहे
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पालकांच्या आर्थिक लुटीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता स्कूल बसचे भाडे खाजगी चालक नव्हे, तर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTO) निश्चित करणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. या निर्णयामुळे स्कूल बस चालकांच्या मनामनीला चाप बसणार आहे. स्कूल बसच्या नावाखाली पालकांची अक्षरश: लूट होत होती. या निर्णयामुळे आता पालकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.
अनेक शाळा आणि बस चालक पालकांकडून संपूर्ण वर्षाचे भाडे आगाऊ (Advance) घेतात. मात्र, गृह विभागाने प्रसिद्ध केलेल्या 'महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) नियम, 2026' च्या मसुद्यानुसार, आता वार्षिक भाडे घेण्यास मनाई करण्यात आली आहे. पालकांना आता दरमहा मासिक भाडे भरण्याची सुविधा मिळणार आहे. ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. वर्षाच्या भाड्या ऐवजी दर महिन्याचे भाडे दर महिन्यालाच भरावे लागणार आहे. त्यामुळे वार्षिक फी चा भार पालकांवर पडणार नाही.
त्याच बरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. केवळ भाडेच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही सरकारने कडक पावले उचलली आहेत. महिला परिचारिका बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्व-प्राथमिक ते इयत्ता 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बसमध्ये महिला अटेंडंट असणे आता अनिवार्य असेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चढण्या-उतरण्याच्या वेळेसह दैनंदिन हजेरी नोंदवावी लागेल. बस चालक आणि वाहकांची चारित्र्य पडताळणी (Police Verification) आणि मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी बसमध्ये सुलभ प्रवेश व्यवस्था आणि प्रशिक्षित कर्मचारी असणे गरजेचे आहे. ही नवीन नियमावली लागू झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत ज्या बस या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांचे परवाने थेट निलंबित किंवा रद्द केले जातील, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला आहे. या अधिसूचनेवर नागरिकांना पुढील 15 दिवसांत आपल्या हरकती आणि सूचना मांडता येतील. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले आहे. तर स्कूल बस चालक याबाबत काय भूमीका घेतात हे पहावं लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world