जाहिरात

'E-20' पेट्रोलवरून पहिला ऐतिहासिक निकाल! कार कंपनीला दणका; ग्राहकाला नवीन कार देण्याचे न्यायालयाचे आदेश

छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा ग्राहक न्यायालयाने एका नामांकित कार कंपनी आणि तिच्या स्थानिक डीलरला एका डॉक्टर ग्राहकाला नवीन कार देण्याचा किंवा 20.50 लाख रुपयांची भरपाई देण्याचा ऐतिहासिक आदेश दिला आहे.

'E-20' पेट्रोलवरून पहिला ऐतिहासिक निकाल! कार कंपनीला दणका; ग्राहकाला नवीन कार देण्याचे न्यायालयाचे आदेश

देशभरात सध्या 'E-20' पेट्रोलच्या वापराबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. याच दरम्यान छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा ग्राहक न्यायालयाने एका नामांकित कार कंपनी आणि तिच्या स्थानिक डीलरला जोरदार दणका दिला आहे. ई-20 पेट्रोल आणि इंजिनमधील बिघाड यावरून ग्राहक न्यायालयाने दिलेला हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच ऐतिहासिक निकाल आहे. न्यायालयाने कार कंपनी आणि डीलर दोघांनाही ग्राहकाची फसवणूक करणे आणि निकृष्ट सेवा देण्यासाठी दोषी धरले आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रशांत कुंडू आणि सदस्य डॉ. आनंद वर्गीस यांच्या खंडपीठाने पीडित डॉक्टर ग्राहकाला त्याच मॉडेलची नवीन, 'E20 पेट्रोल सपोर्ट करणारी' कार देण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.

कंपनी आणि डीलरला 45 दिवसांची मुदत

न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, जर कंपनी आणि डीलरने पुढील 45 दिवसांच्या आत ग्राहकाला नवीन कार दिली नाही, तर त्यांना गाडीची पूर्ण किंमत, आरटीओ (RTO) आणि विमा खर्च मिळून एकूण 20 लाख 50 हजार 494 रुपये ग्राहकाला परत करावे लागतील.

याशिवाय, न्यायालयाने इतरही मोठे दंड ठोठावले आहेत.  निर्धारित मुदतीत पैसे न दिल्यास आदेशाच्या तारखेपासून ते पैसे मिळेपर्यंत 7% दराने वार्षिक व्याज द्यावे लागेल. ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 1 लाख रुपये आणि कोर्टाच्या खर्चापोटी 10 हजार रुपये वेगळे द्यावे लागतील.

(नक्की वाचा-  Rain News: गायब झालेला मान्सून पुन्हा सक्रिय, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट')

काय आहे प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण रायपूरमधील प्रसिद्ध किडनी रोग तज्ज्ञ डॉ. प्रेमराज देवता यांच्याशी संबंधित आहे. त्यांनी जून 2024 मध्ये एका नामांकित कार कंपनीच्या शोरूममधून एक महागडी कार खरेदी केली होती. मात्र, गाडी घेतल्यापासूनच तिच्या इंजिनमध्ये सातत्याने बिघाड होऊन ती वारंवार बंद पडू लागली. जेव्हा डॉक्टर आपली कार सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन गेले, तेव्हा कंपनी आणि डीलरने ती मोफत दुरुस्त करण्यास नकार दिला. कंपनीच्या अभियंत्यांनी दुरुस्तीसाठी थेट 5.30 लाख रुपयांचे बिल डॉक्टर यांना दिले. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण असल्यामुळे इंजिन खराब झाले असून हे वॉरंटीच्या कक्षेत येत नाही, असा दावा कंपनीने केला होता. मात्र, हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कंपनीचे दावे फोल ठरले.

न्यायालयाच्या चौकशीत कंपनीचे दोन मोठे गैरव्यवहार उघड

ग्राहक न्यायालयाच्या सखोल चौकशी दरम्यान कार कंपनीचे दोन मोठे लबाडीचे प्रकार समोर आले.  डॉ. देवता यांना जून 2024 मध्ये जी कार विकण्यात आली होती, तिची निर्मिती जानेवारी 2023 मध्ये झाली होती. म्हणजेच कंपनीने ग्राहकाला अंधारात ठेवून तब्बल पावणेदोन वर्ष जुनी कार नवीन किंमतीत विकली.

(नक्की वाचा-  PF Interest: पीएफचे व्याज कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा! तुमच्या खात्यात पैसे आले का? चेक करा)

सध्या देशातील सर्व पेट्रोल पंपांवर 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20 Petrol) मिळत आहे. तपासात स्पष्ट झाले की, या कारचे इंजिन हे नवीन पेट्रोल सहन करण्यास सक्षम नव्हते आणि कार विकताना कंपनीने ही अत्यंत महत्त्वाची माहिती ग्राहकापासून लपवून ठेवली.

पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणावर सामान्य ग्राहकाचे कोणतेही नियंत्रण नसते, हे मान्य करत न्यायालयाने कंपनीने जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचा ठपका ठेवला. हा निकाल भविष्यात ई-20 पेट्रोल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अशा तक्रारींसाठी देशात एक मोठा वस्तुपाठ ठरणार आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com