VIDEO : आनंदाश्रमात आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर उधळल्या नोटा, नेमकं काय घडलं?

केदार दिघे यांनी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना म्हटलं की, आनंदाश्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मला ठाण्यातून अनेकांचे फोन येत आहेत. मी याआधीही सांगितलं होतं की आनंद आश्रम आता आनंद आश्रम राहिलेलं नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंदआश्रमात कार्यकर्त्यांनी नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जनादरम्यान आनंदाश्रमात कार्यकर्त्यांनी ढोल वाजवणाऱ्यांवर नोटा उधळल्या आहेत. आनंदाश्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. ट्वीटमध्ये केदार दिघे यांनी म्हटलं की, "तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या. दिघे साहेबांच्या समाजसेवेचे पावित्र्य नष्ट केले. आमचा आनंद हरपला!"

केदार दिघे यांनी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना म्हटलं की, "आनंदाश्रमातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मला ठाण्यातून अनेकांचे फोन येत आहेत. मी याआधीही सांगितलं होतं की आनंद आश्रम आता आनंद आश्रम राहिलेलं नाही. कारण ज्या माणसाला आपण पुजतो, ज्याला आपण दैवत मानतो त्यांच्या प्रतिमेच्या समोर हे कार्यकर्ते चपला घालून नाचत आहेत. ज्या पद्धतीने नोटा उडवल्या जात आहेत, ही आपली संस्कृती नाही. अशा पद्धतीचे संस्कार आम्हाला दिघे साहेबांनी दिले नाहीत. 

( नक्की वाचा : 'तुम्ही 'पिंक' झालात आणि घाबरून का गेलात?' कार्यकर्त्याचा अजित पवारांना झणझणीत सवाल )

लोकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अत्यंत दु:ख झालं आहे. ठाणे जिल्ह्याची, ठाणेकरांची ही शोकांतिका आहे. दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात असा प्रकार घडणे दुर्दैवी आहे. मानधन द्यायचं होतं तर वेगळ्या पद्धतीने देता आलं असतं. अशा पद्धतीने आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळण्याची ही कोणती पद्धत आहे. मला हे क्लेशदायी वाटतं. अशी अपेक्षा आम्हाला आनंदाश्रमातून नाही, असं केदार दिघे यांनी म्हटलं. 

Advertisement