Maharashtra Government On Leopard Attack : राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात एकही माणूस मृत्यूमुखी पडणार नाही,यासाठी यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.यासंदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.राज्यातील बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भातील लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य डॉ. जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर, सुनील प्रभु यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे बिबट्यांसाठी बचाव केंद्र सुरु करण्यात आले आहे.
वनमंत्री नाईक यांनी म्हटलंय की,पुणे,अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.बिबट्या हा प्राणी केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल एक मध्ये असल्याने कार्यवाही करण्यात मर्यादा आहेत.त्यामुळे बिबट्याचा समावेश शेड्यूल एक मधून शेड्यूल दोन मध्ये करण्याची विनंती केंद्र शासनाकडे केली आहे.त्याबरोबर केंद्रीय वन विभागाने राज्यातील पाच बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी दिली असून याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे.सहा महिन्यात त्याचा अहवाल आल्यानंतर आणखी बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल.
नक्की वाचा >> Pune News: शीतल तेजवानीचं बॉलिवूड कनेक्शन समोर, ट्रॅम्प टॉवर फ्लॅट, रणबीर कपूर अन् बरंच काही..
पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे बिबट्यांसाठी बचाव केंद्र
पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे बिबट्यांसाठी बचाव केंद्र सुरू करण्यात आले असून त्याची क्षमता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय अहिल्यानगर मध्येही बचाव केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.पुणे जिल्ह्यात 1200 पिंजरे देण्यात आले असून नाशिक व अहिल्यानगरमध्येही पिंजरे देण्यात आले आहेत. भविष्यात आणखी पिंजरे वाढविण्यात येतील. तसेच लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यास तातडीने पिंजरे पुरविण्याच्या सूचना विभागास देण्यात आले आहेत. तसेच बिबट्यांवर लक्ष ठेवून त्याच्या हालचालींची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यात आली आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरातील शाळांची वेळ बदलण्यात आल्याची माहितीही मंत्री नाईक यांनी यावेळी दिली.
जंगलाच्या सीमेवर बांबूचे कुंपण लावणार
बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी गृह,वन व महसूल विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक तरुणांना सहभागी करून घेण्याचा विचार करण्यात येत आहे.जंगलातच वन्य जीवांना खाद्य मिळावे,यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जंगलाच्या सीमेवर बांबूचे कुंपण लावण्याचे नियोजन आहे.या प्रश्नांवर सर्व लोकप्रतिनीधी,वन व महसूल विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडविण्यात येतील,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात रंगणार 'पुस्तक महोत्सव, तारीख अन् ठिकाण कोणतं? वाचकांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचीही संधी
बिबट्याच्या हल्ल्यासंदर्भात अधिवेशन काळात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची महसूल विभागनिहाय बैठका घेऊन मार्ग काढण्याची विनंती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.या चर्चेत सदस्य डॉ.जितेंद्र आव्हाड,नाना पटोले,शरद सोनवणे,अब्दुल सत्तार,कृष्णा खोपडे यांच्यासह विविध सदस्यांनी सहभाग घेतला.