Orange Gate–Marine Drive Twin Tunnel Project: मुंबईतील वाढत्या वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजना म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऑरेंज गेट (Orange Gate) ते मरीन ड्राइव्ह (Marine Drive) दरम्यान नागरी रस्ता बोगदा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि पूरक उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पास अधिक गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. यावेळेस त्यांनी ही माहिती दिलीय.
(नक्की वाचा: Devendra Fadnavis: मुंबईमध्ये उभारलं जाणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पी. डी'मेलो रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच पूर्व मुक्तमार्ग आणि अटल सेतूसोबत अखंड जोडणी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर असून टनेल बोरिंग मशीनचे कार्य, जमीन हस्तांतरण आणि पाइल फाउंडेशनची कामे वेगाने सुरू आहेत. वाहतूक विभागासोबत (Traffic Department) सातत्याने समन्वय ठेवून सुधारित तांत्रिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एस. व्ही. पटेल रस्ता आणि मरीन ड्राइव्ह येथे आवश्यक त्या सुधारणा आणि विस्तारिकरणाची कामे नियोजनानुसार करण्यात यावीत.
(नक्की वाचा: Circuit train: गडकिल्ल्यांना जोडणारी आयकॉनिक रेल्वे टूर, फडणवीसांसह रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा)
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील (South Mumbai) वाहतूक कोंडी कमी होणार आहे. याशिवाय प्रदूषणाच्या पातळीत घट होऊन वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध दिशा मिळेल. दक्षिण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवा आयाम देणारा आणि आर्थिक तसेच भौगोलिक दृष्टीने शहराच्या विकासाला वेग देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होण्याबरोबर प्रवाशांच्या वेळ आणि खर्चात बचत होईल. हा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
(नक्की वाचा: Railway News : बदलापूरहून अर्ध्या तासात नवी मुंबई गाठता येणार; रेल्वेच्या नव्या मार्गाला मंजुरी)