आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुक कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे गेल्यावेळी एकत्र असलेले पक्ष आता एकमेकांच्या विरोधात आहे. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीची गणितं देखील वेगळी असणार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत काही महत्त्वाच्या मतदारसंघात पैठण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
पैठण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ला समजला जातो. माजी मंत्री आणि सध्या छत्रपती संभाजी नगरचे खासदार असलेले संदिपान भुमरे पाच वेळा याच मतदारसंघातून निवडून आले आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे आणि शिवसेनेचे संदिपान भुमरे यांच्यात सामना झाला होता. ज्यात भुमरे यांचा 14 हजार 139 मतांनी विजय झाला होता.
इच्छुकांची यादी....
पैठण विधानसभा मतदारसंघ माजी मंत्री तथा खासदार संदिपान भुमरे यांचा बालेकिल्ला समजला जातो. भुमरे आतापर्यंत या मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहे. मात्र आता ते खासदार झाल्याने पैठण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असणार याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी देखील या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. ज्यात डॉ. सुनील शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.
महाविकास आघाडीचा विचार केल्यास पैठण विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते संजय वाघचौरे पैठण विधानसभा निवडणुकीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. पण नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या पैठणमधून ठाकरे गटाकडून दत्ता गोर्डे, मनोज पेरे विधानसभेची तयारी करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कुणाच्या वाटेला येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नक्की वाचा - राष्ट्रवादीचं ठरलं! सोलापुरात विधानसभेला मोहिते- पाटील पॅटर्न
भुमरेंची प्रतिष्ठा पणाला लागणार...
पैठण विधानसभा मतदारसंघ संदिपान भुमरे यांच्यामुळे नेहमी चर्चेत राहिला आहे. साखर कारखान्यातील स्लिप बॉय ते कॅबिनेट मंत्री आणि आता खासदार भुमरेंचा प्रवास राहिला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्यांपैकी संदिपान भुमरे यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पैठण विधानसभा मतदारसंघात संदिपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
पैठण विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
1962 कल्याणराव पंढरीनाथ पाटील (काँग्रेस)
1967 कल्याणराव पंढरीनाथ पाटील (काँग्रेस)
1972 कल्याणराव पंढरीनाथ पाटील (काँग्रेस)
1978 भाऊराव थोरात (JNP)
1980 शिवाजी काळे (काँग्रेस आय)
1985 चंद्रकांत घोडके (आयसीएस)
1990 बबनराव वाघचौरे (शिवसेना)
1995 संदिपान भुमरे (शिवसेना)
1999 संदिपान भुमरे (शिवसेना)
2004 संदिपान भुमरे (शिवसेना)
2009 संजय वाघचौरे (राष्ट्रवादी)
2014 संदिपान भुमरे (शिवसेना)
2018 संदिपान भुमरे (शिवसेना)