Palghar News: आभाळ फाटलं, डोळ्यादेखत आयुष्य वाहून गेलं आणि चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला. अशा भयानक परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या एका कुटुंबाला आपल्या मुलाबाळांसह थेट घराच्या छतावर रात्र काढावी लागली. पुराच्या पाण्याची पातळी इतकी वाढली होती की घराचे छत गाठण्यासाठी खिडकी तोडावी लागली. सात ते आठ तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या या हतबल कुटुंबाचा आणि त्यांच्या चिमुरड्यांचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. महापुराने सगळं काही हिरावून नेल्यानंतर आता हे कुटुंब उघड्यावर आलं असून, त्यांची मन सुन्न करणारी व्यथा ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार पालघर जिल्ह्यातील केळवे रोड येथील देवीपाडा गावात घडला आहे. गेल्या 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे केळवे पूर्वेकडील देवीपाडा, मायखोप ग्रामपंचायत हद्दीतील तरडे पाडा, देव शेत, झंजारोळी आणि मंडळ पाडा या गावांना महापुराने वेढले होते. याच दरम्यान देवीपाडा गावातील दिनेश काशिनाथ बाबर यांच्या घराला पुराच्या पाण्याचा मोठा वेढा पडला. बाहेर पडायला कोणताही रस्ता उरला नव्हता. अखेर आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी दिनेश बाबर यांनी घराची खिडकी तोडली आणि सर्वांना थेट छपरावर नेऊन बसवले.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )
पूरग्रस्तांची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी
या महापुरात घराच्या पत्र्यापर्यंत पाणी आले होते, अशी आठवण सांगताना पूरग्रस्त कुटुंबाला आपले अश्रू आवरता आले नाहीत. आम्ही कसाबासा आमचा जीव वाचवला, खिडकीतून कसंबसं बाहेर पडून आधी गोठ्यात गेलो आणि त्यानंतर सलग सात ते आठ तास आम्ही छतावर बसून राहिलो, असे त्यांनी सांगितले. त्या काळ्याकुट्ट रात्री अथांग पसरलेल्या पाण्यात आता आपण जिवंत राहू की नाही, अशी भीती त्यांना वाटत होती. ते मदतीसाठी गावकऱ्यांना ओरडून विनंती करत होते, पण पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की कोणालाही त्यांच्यापर्यंत मदतीसाठी पोहोचता आले नाही.
सर्वस्व वाहून गेलं, अन्नधान्याची दैना
पूर ओसरल्यानंतर आता या कुटुंबासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्या डोळ्यादेखत घरातील सर्व वस्तू, कपडे आणि अन्नधान्य पाण्यात वाहून गेले आहे. घरातील पाळीव बकऱ्या आणि इतर जनावरंही या पुरात वाहून गेली आहेत. घरात आता खायला अन्नाचा एक कणही शिल्लक राहिलेला नाही. संपूर्ण संसार उघड्यावर आल्यामुळे या कुटुंबाची जगण्यासाठीची धडपड आता सुरू झाली आहे.
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही मदत मिळेना
या भीषण पुरानंतर आज 4 दिवस उलटून गेले आहेत. परिसराचे पालकमंत्री गणेश नाईक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा केला, परिस्थितीची पाहणी केली. मात्र, पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यानंतरही या पूरग्रस्त कुटुंबासह गावातील इतर नागरिकांना अद्याप कोणतीही तातडीची शासकीय मदत मिळालेली नाही. अन्नधान्य, कपडे आणि जीवनावश्यक साहित्यासाठी येथील नागरिक अजूनही प्रशासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world