मनोज सातवी, पालघर
पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ आरोग्यव्यवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या महिलेच्या प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वैशाली अशोक बात्रे (वय 25) असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव असून, तिला खोडाळा येथून 22 ऑक्टोबर रोजी सकाळी प्रसूतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तब्बल 12 तास कोणताही डॉक्टर हजर नव्हता, तर केवळ एक परिचारिका उपलब्ध होती. वैद्यकीय सल्ल्याअभावी आणि तज्ज्ञ डॉक्टर अनुपस्थित असल्याने प्रसूतीदरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. ऐन दिवाळीत या आदिवासी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संतापजनक बाब म्हणजे प्रसूतीनंतर मृत बालक आणि माता यांना पुन्हा खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आल्याने वैद्यकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणा आणि मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल झाल्यापासून वैशाली यांना कोणतीही वैद्यकीय तपासणी, देखरेख किंवा सल्ला मिळाला नाही. रात्री उशिरा प्रसूती करण्यात आली, परंतु तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि वेळेवर उपचार न झाल्याने बालकाचा जन्मानंतर काही क्षणातच मृत्यू झाला. वैशाली यांचे पती अशोक बात्रे यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, “दिवसभर कोणताही डॉक्टर आला नाही. वेळेत वरिष्ठ रुग्णालयात हलवले असते, तर माझे बाळ आज जिवंत असते.”
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
दरम्यान, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भारतकुमार महाले यांनी बाळाच्या नैसर्गिक शारीरिक त्रुटींमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे घडलेला हा प्रकार आरोग्य विभागाच्या बेफिकिरीचे उदाहरण ठरत असून आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेचे गंभीर वास्तव समोर आणतो.
याआधीही घडल्यात अशा घटना
1) जून 2025 मध्ये देखील मोखाड्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने अर्भकाचा मातेच्या पोटातच मृत्यू झाला होता. प्रसूतीसाठी या मातेला घरापासून खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, तिथून मोखाडा ग्रामीण रुग्णालय आणि तेथून पुन्हा नाशिक जिल्हा रुग्णालय अशी भटकंती करावी लागली होती. अविता सखाराम कवर असं या दुर्दैवी मातेचे नाव होते. याशिवाय मृत अर्भक घरी नेण्यासाठी देखील रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर मृत अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन नाशिकपासून मोखाडा एसटीने प्रवास करून गाव गाठाण्याची वेळ या कवर कुटुंबावर आली होती.
(नक्की वाचा- 'मी SDM आहे...'; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला थोबडवलं, त्यानंतर जे घडलं CCTV व्हायरल)
2) पालघरच्या मोखाडा या अतिदुर्गम भागात गर्भवती महिलेची प्रसुती सामान्य होऊन देखील तिचा मृत्यू झाला असून तिचं बाळ सुदैवाने बचावलं होतं. मोखाडा तालुक्यापासून 15 किमी अंतरावर असलेल्या मोऱ्हांडा ग्रामपंचायत मधील कोलद्याचा पाडा येथील गरोदरमाता आशा भुसारे हिला प्रसूतीसाठी 25 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3 वाजता मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिच्यावर दिवसभर कोणताही उपचार न करता डिलिव्हरीसाठी इथून तिथून येजा करण्यास सांगितले. असे करत दुसरा दिवस उलटला. दुसऱ्या दिवशी मातेने नवजात बालकाला जन्म दिला. परंतु यानंतर तिला प्रचंड रक्तस्राव होऊ लागल्याने तिचा मृत्यू झाला.
3) तर नोव्हेंबर 2024 मधे डहाणू तालुक्यातील सारणी गावातल्या पिंकी डोंगरकर या 26 वर्षीय गर्भवतीचा आणि बाळाचा मृत्यू झाला होता. पिंकी हिला कासा उपजिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी सेलवासा येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र वेळेत रुग्णवाहिका आणि वेळेवर उपचार मिळाले नसल्याने तिचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांनि आरोप केला होता.